ठाणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीकामात मदत व्हावी, त्यांना हवामान, बाजारभाव, पिक सल्ला आणि शासनाच्या योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागामार्फत “महाविस्तार एआय” हे अत्याधुनिक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. “शेतकऱ्याचा डिजिटल मित्र” म्हणून ओळखले जाणारे हे ॲप शेतकऱ्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची जोड देणारे सर्वसमावेशक व्यासपीठ ठरणार आहे.

“महाविस्तार एआय” ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या रोजच्या शेती कामकाजासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. या ॲपमध्ये हवामान अंदाज, पिकांच्या विविध टप्प्यांनुसार वैज्ञानिक सल्ला, पिकांसाठी लागणारी खतांची अचूक मात्रा, किड व रोगांविषयी माहिती तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचा बाजारभाव जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. अगदी एका क्लिकवर शेतीसाठी लागणारी यंत्रे व अवजारे भाडेतत्त्वावर मिळविण्यासाठी गावाजवळ असणाऱ्या अवजारे बँकांची माहितीही या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील योजनांची सविस्तर माहिती, विविध घटकांकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी यांचे स्पष्टीकरण देखील यात उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या ऑनलाईन शेतीशाळा व मार्गदर्शक व्हिडिओंच्या माध्यमातून शेतीत नव्या पद्धती आत्मसात करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या ॲपचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल प्ले स्टोअरवरून “महाविस्तार एआय” हे ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर आपल्या शेतकरी आयडी द्वारे लॉगिन करून आपले नाव, गाव आणि तालुका प्रविष्ट केल्यास, गावनिहाय व तालुकानिहाय अद्ययावत माहिती लगेचच उपलब्ध होते. ॲप होम पेजवर शेतीविषयक आवश्यक सर्व माहिती सोप्या व समजण्यास सोप्या भाषेत पाहता येते. तसेच, “मला प्रश्न विचारा” या विशेष विभागातून शेतकरी आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी थेट प्रश्न विचारू शकतात आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवू शकतात.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळून त्यांच्या शेती कामकाजात कार्यक्षमता वाढावी, नव्या संधींचे दालन खुले व्हावे, आणि शासनाच्या योजना सुलभतेने त्यांच्या हाताशी याव्यात, या उद्देशाने “महाविस्तार एआय” हे ॲप साकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या अभिनव डिजिटल साधनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.