अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या नालेसफाईच्या कामात दिरंगाई होत असल्याने त्याचा फटका कल्याण बदलापूर राज्य मार्गाला बसला. बुधवारी कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील नाल्यातील कचरा दुपारी काढून रस्त्याच्याच कडेला टाकण्यात आला. मात्र त्यामुळे बदलापुरकडे जाणाऱ्या मार्गिकेतील निम्मा भाग व्यापला गेला होता. त्यामुळे विमको नाका, लादी नाका या भागात वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करत होते.
यंदाच्या वर्षात मोसमी पावसाचा प्रवास काहीसा लवकर सुरू झाला. त्यामुळे अवकाळी पावसाने मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोसळण्यास सुरूवात केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे वेळापत्रक बिघडले आहे. पावसाळापूर्व तयारीचे नियोजन करण्यात पालिका, महावितरणसारख्या संस्थांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. अशाचत आता नालेसफाईच्या कामांनाही सुरूवात झाली आहे.
अंबरनाथ नगरापालिकेच्या वतीने बुधवारी पश्चिमेतील कल्याण बदलापूर राज्यमार्गावर असलेल्या अंतर्गत नाल्यांच्या सफाईचे काम केले जात होते. दुपारपर्यंत विमको नाका, लादी नाका या भागातील नाल्यातील कचरा काढण्यात आला होता. मात्र हा कचरा राज्य मार्गावरच नविन भेंडीपाडा परिसराच्या अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वारावर वर्दळीच्या चौकात टाकण्यात आला होता. त्यामुळे विमको नाक्यावरून पुढे येणारी वाहने एका मार्गिकेत एकत्र होत होती. त्यामुळे या भागात कोंडी होत होती. येथे शेजारीच एक सीएनजी पंप असल्याने येथे वाहने वळण घेत असतात. एक मार्गिका बंद झाल्याने कोंडी वाढली होती.
पुढे लादी नाक्याजवळील नाल्यातील कचराही अशाच पद्धतीने रस्त्यावर टाकण्यात आला होता. लादी नाका परिसरात बदलापुरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भर चौकात मोठा खड्डा लागतो. त्यामुळे येथे वाहने हळू जातात. परिणामी चौकात कोंडी होत असते. त्यात कचरा टाकल्याने रस्ता आणखी निमुळता झाला होता. त्यामुळे येथेही कोंडी होत होती. या नाल्यातील कचऱ्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. त्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास कोसळलेल्या पावसामुळे या कचऱ्यातील काळेशार पाणीही पसरले होते.
सिग्नलवरील ते खड्डे जैसे थे
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर फॉरेस्ट नाका चौकात कोणत्यातरी कामासाठी वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याला चर मारण्यात आला होता. पावसाच्या पाण्याने हा चर खड्ड्यासारखा खोल झाला आहे. येथून वाहने जातांना सावकाशपणे घेऊन जावी लागतात. परिणाम चौकातून सिग्नल सुटल्यानंतर वाहने वेगाने निघण्याऐवजी संथगतीने पुढे जातात. त्यामुळे कोंडी होते. हे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून जैसे थे आहेत.