Ganesh Visarjan 2025 : ठाणे : अनंत चतूर्दशी म्हणजेच उद्या अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचा देखील समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपतीच्या विसर्जनाची जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यात यंदा ७९४ सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. यंदा ठाणे शहरात देखील मोठ्या उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे ठाणे शहरातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकांचे देखील यंदा आकर्षण असणार आहे. ठाण्यात यंदा ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणुका टाळून गणरायाला पारंपारिक टाळ-मृदंग आणि ढोलकी, भजन, कीर्तनाच्या गजरात निरोप देण्याचा निर्णय काही सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. त्याचबरोबर गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करीत पारंपारिक वेशभुषेत मिरवणुका काढल्या जाणार आहेत. तर, यंदा मिरवणुकांमध्ये विविध सामाजिक संदेश देखील दिले जाणार आहेत.

परंतू, ठाणे शहरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मिरवणूक ही आगळी वेगळी आणि हटके ठरणार असल्याची चिन्हे आहेत. वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर परिसरात विश्वेश्वर मंदिराजवळ सार्वजनिक उत्सव मंडळ आहे. हे मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित गणपती विसर्जन मिरवणूक काढतात. यंदा देखील या मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूकीसाठी वेगळा विषय घेतला आहे.

या मंडळाच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक यंदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित असणार आहे. दरवर्षी या मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने निघत असून या मिरवणूकीच्या माध्यामातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चलचित्र साकारून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे मंडळ गणपती विसर्जन मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणूकीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडला जाणार आहे.

शिवसेना गटनेते आणि नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित साकारण्यात येणाऱ्या चलचित्रासह या मिरवणूकीत भजन-किर्तनाचा नादही घुमणार आहे. या मिरवणूकीत पुरुषांसह महिला, तरुण मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा देखील सहभाग असणार आहे, अशी माहिती दिलीप बारटक्के यांनी दिली. धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथून प्रस्थान होऊन वर्तकनगर पर्यंत ही मिरवणूक निघणार आहे. मागील वर्षी या मंडळाने ‘ब्रो ठाणे बदलतंय’ याविषयावर विसर्जन मिरवणूक काढली होती. यंदाच्या मिरवणूकीत देखील सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप बारटक्के यांनी केले आहे.