Thane Municipal corporation, Thane News : पुणे येथील बालेवाडीच नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील खेळाडूंनी बाजी मारली असून १३ सूवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्यपदके जिंकून महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे.

महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स अंजिक्यपद स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. नुकतीच ३९ वी स्पर्धा पुणे येथील बालेवाडीत पार पडली. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन (MAA) द्वारे केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना त्यांच्यात असलेले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून दोन हजाराहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षीची महाराष्ट्र राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २ ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी देखील सहभाग नोंदवत उल्लेखणीय कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व खेळाडू ठाणे महापालिका ॲथलेटिक्स प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. ठाणे महापालिका उपआयुक्त (क्रिडा व सांस्कृतिक) मीनल पलांडे आणि ठाणे महापालिका ॲथलेटिक्स प्रशिक्षण योजना प्रमुख अशोक आहेर यांनी खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

खेळाडूंची कामगिरी

वयोगट १६ वर्षांखालील (मुली) मिहिका सुर्वे हिने ६० मीटर आणि मेडली रिले स्पर्धेत सुवर्णपदक, १८ वर्षांखालील (मुली) श्रेष्ठा शेट्टी हिने लांब उडी आणि मेडली रिले स्पर्धेत सुवर्णपदक, कानन देसाई हिने मेडली रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तर, १६ वर्षांखालील ( मुले ) मानस शिंदे याने पेंटाथलॉन आणि मेडली रिले यास्पर्धेत सुवर्णपदक आणि ६०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.

१८ वर्षांखालील( मुले)अथर्व भोईर याने १०० मीटर आणि २०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक आणि मेडली रिले स्पर्धेत कांस्यपदक तर, तनिश लोटणकर याने मेडली रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तसेच २० वर्षांखालील (मुले) निखिल ढाके याने २०० मीटर, ४०० मीटर आणि ४ x ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक, अली शेख याने ४०० मीटर अडथळा, ४ x ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक आणि ४०० मीटर रौप्यपदक तर, ऋषभ यादव याने ११० मीटर अडथळा स्पर्धेत रौप्यपदक, ४०० मीटर अडथळा – कांस्यपदक आणि ४ x ४०० मीटर रिले सुवर्णपदक पटकावले आहे.