Ganeshotsav 2025 Thane ठाणे – गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोष, उत्साहाचे वातावरण असते. गणेशाच्या आराधनेसाठी काही दिवस आधीपासूनच भाविकांची लगबग सुरू असते. गणेशाच्या तयारीत सर्वात महत्वाचे ठरते ती म्हणजे मखर. गणेशोत्सवात सगळीकडे नवनवीन संकल्पना, विविध रंगांची सजावट आणि भक्तीभावाने सजलेले घरगुती तसेच सार्वजनिक आरास विशेष ठरत असतात. सर्वजण उत्तमोत्तम देखावे साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अशातच स्त्रीच्या जीवनातील महत्वाचा काळ म्हणजे मातृत्व. याच मातृत्वाची गाथा सांगणारा देखावा बदलापूरात साकारण्यात आला आहे.

गणेशोत्सवामुळे सर्वत्रच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस आधीपासूनच उत्साहाने सर्वचजण विविध संकल्पनांवर आधारित देखावे साकारण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत होते. मागील काही वर्षांपासून घरगुती तसे सार्वजनिक गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याकडे कल आहे.

प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा वापर टाळून नैसर्गिक साहित्य, कागद, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून सजावट करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील विविध मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले आहेत. यामध्ये शहरातील सांस्कृतिक, जुन्या स्थळांचा देखावा, पर्यावरणाचा संदेश देणारे देखावे असे विविध देखावे साकारण्यात आले आहेत.

अशातच बदलापूरातील हायलँड्सचा राजा या मंडळाने यंदा मातृत्व आणि पर्यावरणपूरकता या दुहेरी संदेशांचा संगम असणारा देखावा साकारला आहे. यावर्षीची संकल्पना ही ‘आई’ या विषयावर आधारित आहे. या सजावटीच्या पार्श्वभूमीवर दुर्गामातेची भव्य प्रतिकृती साकारली आहे. देवीच्या हृदयात आई आपल्या बाळाला कवेत घेतलेले दृश्य साकारले असून मातृत्वाचे अमर्याद प्रेम आणि दुर्गामातेचा स्नेह यांचा मेळ साधण्यात आला आहे.

या देखाव्यात ‘आई’, ‘अम्मा’, ‘माता’, ‘मातोश्री’ असे विविध भाषांमधील शब्द सजावटीत लावण्यात आले आहेत. आई-मुलाच्या नात्याचा प्रवास गर्भधारणेपासून वृद्धत्वापर्यंत दाखवताना, कधी आईची काळजी तर कधी मुलाची जबाबदारी या दोन्हींचे जिवंत चित्रण मंडळाने साकारले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जात आहे. कागदापासून घडवलेली मूर्ती ही पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी ठरत आहे.

मागील वर्षीचा देखावा काय ?

मागच्या वर्षी बदलापूरातील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर मंडळाने देखावा साकारला होता. यामध्ये शाळेतील फळ्यावर ‘स्टॉप रेप क्लचर’, ‘हमे देखनी है आझादी’, ‘कन्यां प्रकुर्वत: मृतायां वघ:’ असे अनेक संदेश लिहून चित्रे रेखटण्यात आली होती. देखाव्याच्या एका बाजूस स्त्रीचे रक्षण करताना महादेव तर, दुसऱ्या बाजूस देवीकडे न्याय मागणारी लहान मुलगी असे चित्र रेखाटले होते.

तरूणाईची सामाजिक संदेश देण्यासाठी तळमळ

यंदाचा मातृत्वाची गाथा सांगणारा देखावा वेदांत मोरे, जयेश सावंत, शुभम अउटी, निखिल खांडेकर, आयुष पाटील, देवेश मोरे, अक्षित जाधव, मिहीर काजरेकरस हर्ष सावंत, शिवम मोरे, शुभम राठोड, सोमियो, वेदांत खताळ, अर्णव गाडे यांच्या सहभागातून साकारला गेला.