बदलापूरः पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहरांमध्ये इच्छुकांनी आपला जनसंपर्क वेगाने करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आलेल्या दिवाळी सणाचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी सर्व पक्षियांनी कंबर कसली असून उटणे, पणत्या, रांगोळी, दिवाळीचे कंदिल असे साहित्य वाटपाचा झपाटा लावला आहे. काही ठिकाणी फराळ निर्मितीसाठी लागणारे साहित्यही मोफत किंवा कमी दरात दिले जाते आहे. त्यामुळे मतदारांची चंगळ सुरू आहे. मात्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चिक जनसंपर्कामुळे नवखे इच्छूकांच्या खिशाला फटका बसतो आहे.
कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या निवडणुका तब्बल १० वर्षांनंतर होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांना त्याचे वेध लागले आहेत. गेल्या दहा वर्षात विविध कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली. परिणामी तो संपूर्ण काळ मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवकांना खर्चिक जनसंपर्क ठेवावा लागला. आता दोन्ही शहरांमध्ये प्रभाग रचना अंतिम झाली असून प्रभाग आरक्षणही जाहीर झाले आहे. सोबतच दोन्ही नगरपालिकांमधल्या नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडतही संपन्न झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या मतदार यादी सुधारणा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी जनसंपर्क मोहिमेवर भर दिला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी इच्छुक अनेक क्लुप्त्या लढवत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ साहित्य निर्मितीचे वाटप करण्याकडे काही इच्छुकांनी आपला मोर्चा वळवला आहे. अंबरनाथमध्ये नुकताच असा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. त्यासोबतच प्रभागातील प्रत्येक घरात सुगंधी उटणे, पणत्या, कंदिल देण्यासाठी पाकिटे आणि पिशव्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक इच्छुक आपल्या विशेष आणि इतर मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या मतदारांना देण्यासाठी विशेष भेटवस्तूही तयार ठेवल्या आहेत. काही ठिकाणी शालेय विद्यार्थी, महिलांसाठी किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने आकर्षण रोषणाई, रांगोळ्यांची आरास करण्यासाठी स्वच्छता मोहिमाही राबवण्याचा निर्णय काही इच्छुकांनी घेतला आहे. काही इच्छुकांनी सामुहिकपणे दिवाळी पहाट कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिवाळी सणाचा जनसंपर्कासाठी पुरेपूर वापर करून घेण्यासाठी इच्छुकांची जय्यत तयारी सुरू असून लगबग वाढली आहे.
नव्या प्रभागांमुळे चित्र स्पष्ट
काही इच्छुकांनी नव्या प्रभागांमध्ये प्रवेश सुरू केला आहे. त्यामुळे मतदारही या नव्या इच्छुकांमुळे संभ्रमात आहेत. आरक्षण आणि प्रभाग रचनेनंतर पक्षांच्या नेत्यांनी इच्छुकांना तयारीचे आदेश दिले आहेत.