ठाणे : भिवंडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत एका तरुणाने ते चित्रीकरण त्याच्या मैत्रिणीला आणि एका मित्राला पाठविले. या तरुणीने भिवंडी येथील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तिघांविरोधात अटकेची तजविज ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच मागील काही वर्षामध्ये समाज माध्यमांचा वापर वाढला असताना दुसरीकडे या समाजमाध्यमांच्या गैर वापरामुळे आता गुन्हे देखील घडू लागले आहेत. अश्लील चित्रीकरण तयार करुन धमक्या देणे असे प्रकार घडत आहेत. भिवंडीत असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

भिवंडी शहरात १९ वर्षांची तरुणी राहते. तिची ओळख याच शहरात राहणाऱ्या २२ वर्षीय मुलासोबत झाली होती. २९ डिसेंबरला त्या तरुणाने तिला एका हाॅटेलमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचार करताना त्याने लैंगिक अत्याचार करतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये तयार केले. त्यानंतर त्याने ते चित्रीकरण त्याची मैत्रिण आणि मित्राला देखील व्हाॅट्सॲपवर पाठविले. या दोघांनी नंतर त्या तरुणीला ते चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. तर अत्याचार करणाऱ्या तरुणाने काही दिवसांनी त्याच्या व्हाॅट्सॲप समुहात, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर चित्रीकरण प्रसारित करत तरुणीची बदनामी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेनंतर शुक्रवारी तरुणीने भिवंडी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६६ (ब) आणि भारतीय न्याय संहितेचे कलम ३ (५), ३५१ (२), ३५६ (२), ६४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल असलेल्या तिघांविरोधात अटकेची तजविज ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.