ठाणे : भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी खाडीत एका तरुणाने उडी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनुराग केसरी (२८) असे त्याचे नाव असून बचाव पथकांनी त्याचा चार तास शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागू शकला नाही. खाडीला भरती आल्याने येथील शोधकार्य थांबविण्यात आले.

भिवंडी ठाणे मार्गावर कशेळी खाडी आहे. सोमवारी सकाळी कशेळी भागात राहणारा अनुराग हा कारने कशेळी खाडी पूलावर आला. त्यानंतर त्याने मोबाईल तसेच इतर साहित्य कारमध्ये ठेवले. कारमधून बाहेर पडल्यानंतर त्याने थेट खाडीमध्ये उडी मारली. घटनेची माहिती भिवंडी महापालिका आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थाप कक्षाचे कर्मचारी, नारपोली पोलीस, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले.

पथकांनी त्याचा सुमारे चार तास शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागू शकला नाही. खाडीत भरतीची वेळ असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत होता. त्यामुळे नारपोली पोलिसांच्या आदेशानुसार खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले.