रस्त्यांवर अपघाताच्या घटनांप्रमाणेच आता धावत्या गाड्यांना अचानक आग लागण्याच्या घटनाही वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कार अचानक पेटल्यामुळे झालेल्या दुर्घटनाही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अशीच एक घटना ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर घडली असून यात सात जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं ठाणे महानगर पालिकेच्या हवाल्याने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा ही कार पनवेलहून मुंब्रा बायपासमार्गे ठाण्याच्या दिशेने जात होती. मुंब्रा बायपासवर या कारने अचानक पेट घेतला. यावेळी कारमध्ये सात प्रवासी होते. यात चालकाव्यतिरिक्त एक पुरुष, दोन महिला व तीन मुलांचा समावेश होता. कारनं पेट घेतल्याचं लक्षात येताच कारमधील प्रवासी तातडीने उतरले. अवघ्या काही क्षणांत कार पूर्णपणे पेटल्याचं दिसून आलं.

या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात यश मिळवलं. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारमध्ये आग लागण्याची संभाव्य कारणे…

दरम्यान, अशा प्रकारे धावत्या कारमध्ये आग लागण्याची काही संभाव्य कारणं मोटर मेकॅनिकल तज्ज्ञांकडून सांगितली जातात. मोटारीत पार्टस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायबर प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे आग पसरण्यास मदत होते. बोनेटच्या भागातील इंजिन, बॅटरी आणि इलेक्ट्रिक कनेक्शन, सीएनजी किटमध्ये लिकेज असेल किंवा अनधिकृतरीत्या बसवलेली असेल, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. दरम्यान, अशा वेळी घाबरून न जाता वाळू किंवा माती टाकून मोटारीला लागलेली किरकोळ आग विझवता येते.