ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या मासुंदा तलावाजवळील चिंतामणी चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य व्हावे या उद्देशातून ठाणे वाहतूक पोलिसांनी सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी केली होती. त्यास ठाणे महापालिका प्रशासनाने प्रतिसाद देत यासंबंधीचा प्रस्ताव मंजुर केल्याने येथे सिग्नल यंत्रणा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मासुंदा तलाव असून याच परिसरात चिंतामणी चौक आहे. हा चौक ठाणे स्थानक परिसर आणि टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडण्यात आलेला आहे. या चौकाच्या परिसरात नागरिकांची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या चौकातून मुख्य बाजारपेठ, गडकरी रंगायतन, अल्मेडा चौक, ठाणे रेल्वे स्टेशन, कळवा नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने वाहतूक सुरू असते. तसेच मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायतन हे ठाणे शहरातील मुख्य आकर्षण केंद्र असल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त असते. याशिवाय, आजु-बाजूला शाळा असल्याने विद्यार्थीही रस्त्यावरून ये-जा करत असतात. परंतु येथे सिग्नल यंत्रणा नाही. त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. दरम्यान, नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडता यावा तसेच वाहतूक सुरळीत रहावी या उद्देशातून चितामणी चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिकेला दिला होता. ठाणे महापालिका प्रशासनाने प्रतिसाद देत यासंबंधीचा प्रस्ताव केला होता.
नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडता यावा तसेच वाहतूक सुरळीत रहावी यासाठी चिंतामणी चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संबंधिचा सविस्तर प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला होता. त्यास आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिल्यानंतर तो प्रशासकीय सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला होता. या कामासाठी ३१ लाख ७९ हजार २४२ रुपये इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यास प्रशासकीय सभेने मान्यता दिल्याने सिग्नल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.