अंबरनाथ : अंबरनाथ महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील प्रदर्शन दालनात आता नागरिकांना अकराव्या शतकातील शिलाहारकालीन शिवमंदिराचे अप्रतिम शिल्पवैभव जवळून अनुभवता येणार आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधिका डॉ. कुमुद कानिटकर यांच्या दीर्घ अभ्यासातून तयार झालेल्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रे आणि माहितीचे हे प्रदर्शन अंबरनाथकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. हे कायमस्वरूपी प्रदर्शन नाट्यगृहात प्रेक्षक, अभ्यासकांना पाहता येणार आहे.

अंबरनाथच्या ‘आम्रनाथ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिराचा उल्लेख शके ९८७ (इ.स. १०६०) मधील शिलालेखात आढळतो. शिलाहार वंशातील माम्वणी या महामंडलेश्वराने हे मंदिर बांधल्याचे त्यावरून स्पष्ट होते. डॉ. कानिटकर गेली २५ वर्षांहून अधिक काळ अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिराचा सखोल अभ्यास करीत आहेत. त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील हे अनमोल दस्तऐवज आणि छायाचित्रे त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे कायमस्वरूपी सुपूर्द केली आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या पुढाकाराने नाट्यगृहाच्या प्रदर्शन दालनात ही मांडणी करण्यात आली असून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास संशोधक आणि प्राचीन कला रसिकांसाठी हे प्रदर्शन ज्ञानवर्धक ठरणार आहे.

सात विभागांतील माहितीपूर्ण मांडणी प्रदर्शनात मंदिरातील विविध भागांतील ब्रह्मा, विष्णू, हरिहर, गणेश, नरसिंह, दुर्गा, पार्वती, चामुंडा अशा देवतांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहेत. पहिल्या विभागात गेल्या दोन शतकांतील ऐतिहासिक पत्रव्यवहार आणि छायाचित्रे आहेत. विशेष म्हणजे १८६८ साली ब्रिटिश राजवटीत मुंबईतील आणि आताचे जे.जे. कला महाविद्यालयाच्या पथकाने या मंदिराचा अभ्यास केला होता. सरकारकडून मिळालेल्या १३ हजार रुपयांच्या अनुदानातून त्यांनी मंदिराचे २४ आराखडे, ३५ छायाचित्रे आणि ७६ साचे तयार केले होते. त्यापैकी काही दुर्मिळ नमुने या प्रदर्शनात पहायला मिळतात. तसेच १९५३ साली आयुध निर्माणीतील अधिकारी मॅक्स आबल्स आणि हर्मन हेनिंग यांनी मंदिर परिसरातील जत्रेच्या आणि मंदिराच्या अनेक छायाचित्रांचा दस्तऐवजीकरण केले होते. सध्या जर्मनीत राहणाऱ्या मॅक्स आबल्स यांच्या सुपुत्र डॉ. ब्योर्न आबल्स यांच्या संग्रहातून ही छायाचित्रे प्राप्त झाली आहेत.

मंदिराच्या कलात्मकतेचा अभ्यास सुलभ करणारे प्रदर्शन

प्रदर्शनाच्या मधल्या भागात चतुर्मुख शिव, कार्तिकेय, गणेश तसेच देवीची विविध रूपे आणि श्रीशंकराच्या संहार व सौम्य रूपांची शिल्पे दाखवण्यात आली आहेत. यासोबतच काही पुराणकथांच्या संदर्भांद्वारे शिल्पांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. मंदिरातील स्थापत्य घटकांचे छायाचित्रण या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले आहे. “वारसा जपण्याची जबाबदारी नागरिकांची” — डॉ. कानिटकर

“अंबरनाथचे शिवमंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय उदाहरण आहे. या वारशाचे जतन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे डॉ. कुमुद कानिटकर यांनी आवाहन केले. मंदिर परिसरात घंटानाद, लाऊडस्पीकरचा अति वापर, मूर्तींवर अभिषेक आणि मंदिराच्या आतील भागात होणारे होमहवन यामुळे शिल्पांना हानी पोहोचत आहे. अशा कृतींना नागरिकांनीच आळा घालावा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.