Thane Dhanteras 2025 – दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये शनिवारी खरेदीचा उत्साह दिसून आला. शहरातील जांभळीनाका, गोखले रोड, राममारुती रोड, गावदेवी परिसरात नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. यंदा शनिवारी धनत्रयोदशी असल्याने शहरातील सराफ पेढींवर सोने-चांदी खरेदीचा उत्साह दिसून आला. या मुहूर्तावर सोन्या-चांदीची नाणी खरेदी सर्वाधिक करण्यात आली. त्याचप्रमाणे वाहन खरेदी देखील करण्यात आली.

धनत्रोयदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. धनत्रोयदशीच्या दिवशी सोन किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानले जाते. यंदा शनिवारी धनत्रोयदशीचा सण आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी शनिवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. ठाण्यातील राममारूती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर विद्यूत रोषणाईने उजळून निघाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खरेदीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. इलेक्ट्राॅनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.

बाजारात पारंपारिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हे पर्यावरणपूरक कंदिल खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे. तसेच परराज्यातून मागवण्यात आलेल्या पणत्यांना मागणी आहे. दिवाळी पहाट त्यानिमित्त तरुण मुला-मुलींसाठी कपड्यांमध्ये विविध प्रकार आले आहेत. त्यामुळे कपड्यांच्या दुकानातही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच शहरातील सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, कपडे, मिठाई या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत.

मिठाई खरेदी

प्रत्येक सणात खाद्य पदार्थांची रेलचेल सुरू असते. दिवाळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी मिठाईची दुकाने सजली आहेत. दिवाळी निमित्त सुक्या मेव्याला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. कार्यालय किंवा खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भेट म्हणुन सुका मेवा दिला जातो. यासाठी दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी सुक्या मेव्यांचे विविध रंगांमध्ये पेट्या तयार केल्या जातात. या पेट्या ५०० रूपयांपासून आहेत.

यंदा धनत्रयोदशी निमित्त सोन्याचे तसेच चांदीचे नाणे खरेदी केले जात आहेत. सोन्यामध्ये चोकर नेकलेसला पसंती आहे. दिवाळीपूर्वीच सोन्याची ५० टक्के नोंदणी करण्यात आली होती. – महेंद्र संघवी, सराफ

यंदा दिवाळीपूर्वीच जीएसटी कमी झाल्याने वाहन खरेदीला ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.– सुरेंद्र उपाध्याय, हेरिटेज मोटार