कल्याण – दिवाळीनिमित्त दीपोत्सव आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. या निमित्ताने डोंबिवलीतील डाॅ. मेघा विश्वास यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅन्व्हास’ या अभिवाचनात्मक, सांगीतिक कार्यक्रमाने कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबई परिसरात मराठीच्या विविध सांस्कृतिक पैलूंची उधळण करणारे दिवाळी पहाट कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मराठी भाषेच्या उगमापासून ते मराठी भाषेच्या अवकाशातील विविध सांस्कृतिक, साहित्यिक, सांगीतिक पैलू डाॅ. मेघा विश्वास यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर उलगडले आहेत. संत, महात्म्यांपासून ते आताच्या आधुनिक काळात झालेला, होत असलेला मराठी भाषेचा विकास या कार्यक्रमात आहे.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत दिवाळी पहाट निमित्त डाॅ. मेधा विश्वास आणि त्यांच्या चमूने अभिजात मराठी भाषेतील सांस्कृततेची उधळण रसिक प्रेक्षकांवर केली. अगदी राम प्रहरापासून ते संध्याकाळच्या दिवे लावणीपर्यंत प्रहाराप्रमाणे विविध प्रकारची गाणी, भूपाळी, माऊलींची इराणी, भावगीते, भजने, लोकगीते ते लावणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली. या कार्यक्रमातील गाण्यांना वाद्यवृंदाची तितकीच तोलामोलाची साथ मिळाली. त्यामुळे कार्यक्रम एका टिपेला पोहचतो. आपले मराठी भाव विश्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न डाॅ. मेघा विश्वास यांनी केला आहे. आणि त्यांना त्यांच्या सांगीतिक, वाद्यवृंद चमूतील अभिनेते संजीव धुरी, मानसी गर्गे, समीर सुमन, अंशुमान गद्रे, शशांक पडवळ, वरूण देवरे या कलाकारांची मोलाची साथ मिळत आहे.
आपली जुनी गाणी ऐकताना या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध होतो आणि लावणीच्या ठेक्याला डोलायला लागतो. मराठीतील नावे, वस्तूंना असलेली नामावळी ऐकून मराठीची अंतरंगातील खोली दिसते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे यात समाधान न मानता या भाषेतील विविध सांस्कृतिक पैलूही समाजासमोर आले पाहिजेत या दूरृष्टीच्या विचारातून आपण विविध मंचावर हा कार्यक्रम सादर करत आहोत, असे या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका, निर्मात्या डाॅ. मेघा विश्वास सांगतात.
कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईत दिवाळी पहाटनिमित्त आयोजित या कार्यक्रमांना ज्येष्ठ दिग्दर्शक अभिजीत पानसे, अभिनेते रमेश वाणी, अभिनेत्री वंदना मराठे, अभिनेत्री चिन्मयी सुमित, आर. जे. रश्मी वारंग, गणेश आचवल, दीपक वेलणकर, अभिनेते आनंदा कारेकर, माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.
