ठाणे – ठाणे शहरात विविध परिसरात बाजारपेठा आहेत. शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गोखले रोड बाजारपेठ मागील वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत विद्युत रोषणाईने लखलखणार आहे. तसेच ग्राहकांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील असणार असल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आले असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ठाणे शहरातील गोखले रोड परिसर खरेदीसाठी महत्वाचा मानला जातो. या परिसरात विविध नामांकित व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने ग्राहकवर्ग खरेदीसाठी येत असतो. दसरा दिवाळीला अवघे काही दिवस बाकी आहेत. ठाणे शहरातील या काळातील वातावरण उत्साहाचे असते. दिवाळीनिमित्त शहरातील अनेक रस्त्यांवर विद्युत रोषणाई, कंदील लावून सजावट केली जात असते. अशातच मागील वर्षी शहरातील नौपाडा, गोखले रोड परिसरात दसऱ्याच्या दोन दिवस आधीपासून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीपुर्वीच नौपाडा-गोखले रोड परिसर रोषणाईने उजळून गेला होता.

नौपाडा- गोखले रोड बाजारपेठ अनेक वर्षापासून खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मागील वर्षी ग्राहकांसाठी ठाणे नौपाडा व्यापारी मंडळाच्यावतीने खरेदीचा महोत्सवही राबवला होता. यामध्ये सांगितीक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले होते. यंदाही अशाचप्रकारे बाजारपेठ विद्युत रोषणाईने लखलखणार आहे. नवरात्रीपासूनच गोखले रोडवर विद्युत रोषणाई केली जाणार असून ही रोषणाई सोमवार, २२ सप्टेंबरला केली जाणार आहे. तर दिवाळीपर्यंत रस्त्यांवर विद्युत दिव्यांचा लखलखाट असणार आहे. तसेच ग्राहकांसाठी मागील वर्षी प्रमाणेच महोत्सवाचे देखील आयोजन असणार आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी ग्राहकांसाठी असणार आहे.

मागील वर्षी नेमके काय होते ?

नौपाडा- गोखले रोड परिसर ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते. या बाजारपेठेत साड्यांची, दागिन्यांची, कपड्यांची, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तूंची मोठमोठी दुकाने आहेत. या परिसरात मागील वर्षी दसऱ्यापुर्वी संपुर्ण रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई नेत्रदिपक अशी होती. या रस्त्यांने प्रवास करणाऱ्यांना या रोषणाई मुळे हे क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरत नव्हता. तसेच अनेकजण सायंकाळच्यावेळी या रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी छायाचित्र घेण्यासाठी येत होते. तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमात ढोलताशे तसेच कार्टूनच्या वेशभूषेतील व्यक्ती होत्या.

मागीलवर्षी ग्राहकांसाठी खरेदी महोत्सव राबवण्यात आला होता. यंदाही त्याचप्रमाणे नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत बाजारपेठ विद्युत रोषणाईने सजवली जाणार आहे. तसेच ग्राहकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील असणार आहेत. – मितेश शहा, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळ, ठाणे