ठाणे – घोडबंदर परिसरात २४ तासात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून अल्पवयीन मुलासह एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पियुष सोनवणे(१२), तेजस दुधवडे (२१) अशी मृत मुलांची नावे आहेत.

पहिली घटना सोमवारी दुपारी कासारवडवली येथे घडली. वाघबीळ येथील झुम्मा नगर परिसरात पियुष सोनवणे राहत होता. तो इयत्ता पाचवी मध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी तो कासारवडवली येथील राम मंदिर तलावात पोहण्यासाठी गेला होता. परंतु त्याला पाण्याचा अंदाज येऊ शकला नाही. पाण्याचा अंदाज येऊ शकला नसल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी पियुषला तलावा बाहेर काढले. त्याला तात्काळ कासारवडवली पोलीसांनी रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी पियुषला मृत घोषित केले.

दुसरी घटना सोमवारी सायंकाळी ओवळा येथील पानखंडा धरणात घडली. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे तेजस दुधवडे राहत होता. तो ठाण्यातील ओवळा येथे पाहुणा म्हणून आला होता. सोमवारी सायंकाळी तो ओवळा येथील पानखंडा धरणात पोहण्यासाठी गेला होता. परंतु त्याला पाण्याचा अंदाज येऊ शकला नाही. पाण्याचा अंदाज येऊ शकला नसल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच, कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेजसला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ घोडबंदर येथे असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी तेजसला मृत घोषित केले. कासारवडवली पोलिसांनी तेजसचा मृतदेह पुढील कार्यवाही करिता ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. या सलग घडलेल्या दोन बुडण्याच्या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.