ठाणे : ठाणे ते नवी मुंबई या मार्गावरील ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी ठप्प झाली. यामुळे ठाणे स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांनी बस किंवा रिक्षा अशा मिळेल, त्या वाहनाने नवी मुंबईत कामाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु रेल्वे सेवा ठप्प झालेल्या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी दुप्पटपेक्षाही जास्त भाडे आकारत प्रवाशांची लुट केली.

नवी मुंबई शहरात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. तसेच अनेक खासगी कार्यालये आहेत. याठिकाणी ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा भागातील नागरिक काम करतात. हे सर्वजण ठाणे स्थानक येथून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. यामुळे ठाणे स्थानकातील फलाट ९ आणि १०, १० अ येथे नोकरदार वर्गाची मोठी गर्दी असते. ट्रान्स हार्बर मार्गावर ऐरोली काटई नाका उन्नत मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू असून त्यासाठी शुक्रवारी ‘एमएमआरडीए’कडून या ठिकाणी गर्डर उभारण्यात येत होते.

यावेळी गर्डर तिरका असल्याने सुरक्षेच्या उद्देशाने मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गिका सकाळी सात वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. कामावर जाण्यासाठी उशिर होत असल्याने अनेकांनी रिक्षाने नवी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांकडून नवी मुंबईच्या मार्गावर मागणी वाढताच ठाण्यातील अंतर्गत मार्गावर चालविण्यात येणाऱ्या अनेक रिक्षाचालकांनी नेहमीच्या भाड्यापेक्षा दुप्पटचे भाडे आकारत प्रवाशांची लुटमार करत असल्याचे दिसुन आले.

ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना स्थानकाबाहेर आल्यानंतर तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सॅटीस पूलाखाली रिक्षा थांब्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. दररोज या थांब्यावर सकाळ सायंकाळच्यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. येथून अनेकजण इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षा पकडत असतात. मात्र शुक्रवारी झालेल्या ट्रान्स हार्बरवरील बिघाडामुळे रिक्षाचालक नवी मुंबईकडील प्रवासी भाडे घेत असल्याचे दिसुन आले. या कारणामुळे रिक्षांचा तुटवडा भासल्याने ठाणेकरांना बराचवेळ रांगेत उभे राहावे लागल्याने नागरिकांकडुन संताप व्यक्त केला जात होता.

रिक्षाचालक प्रतिक्रिया

आम्ही दररोज घोडबंदर मार्गावर शेअरिंगने रिक्षा चालवतो. परंतु आज सकाळी रेल्वे सेवा बंद पडल्याने प्रवासी रस्त्यावर आले. यामुळे घोडबंदर मार्गावरील रिक्षा ऐरोली मार्गावर वळविण्यात आल्या. परंतु कळवा या ठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण झाल्याने एका फेरीला जास्त वेळ लागत होता. यामुळे रिक्षाचालकांकडून अधिकचे भाडे आकारले जात असल्याचे एका रिक्षा चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली.

ठाणे शहरातील अनेक नागरिक नवी मुंबई याठिकाणी कामासाठी जातात. परंतु आज सकाळी तांत्रिकबिघाडीमुळे सेवा ठप्प झाली. यासाठी स्थानक परिसरातील मीटरप्रमाणे रिक्षा नवी मुंबई मार्गांवर जात होत्या. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी रिक्षाचा तुटवडा निर्माण झाल्याचे सॅटीस पुलाखालील रिक्षा थांब्यावर कार्यरत असणाऱ्या वाहतुक पोलीसांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया

काही रिक्षा चालक जास्ता भाड्याची मागणी करत होते. घणसोली याठिकाणी जाण्यासाठी इतरवेळी ४० रूपये इतके भाडे आकारले जाते परंतु आज १०० रूपये दर सांगण्यात आले. – प्रिती गायकवाड, प्रवासी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील सॅटीस पुलाखालुन नेहमी रिक्षाने कामावर जातो. मात्र शुक्रवारी बराचवेळ होऊनही रिक्षा उपलब्ध झाली नाही – सारंग बोराडे, प्रवासी