ठाणे : ठाणे येथील सिंघानिया शाळा आणि हिरानंदानी मेडोज भागातील पदपथांवर शौचालय उभारणीच्या कामावरून टिका होऊ लागताच, ठाणे महापालिका प्रशासनाने शौचालय उभारणीच्या कामास स्थगिती दिली आहे. तसेच जाहिरात हक्क देऊन त्याबद्दल्यात शौचालयाची उभारणी केली जात होती. मात्र, शौचालय उभारणीआधीच तेथील फलकावर जाहिरात प्रदर्शित करून निविदेतील अटी व शर्तींचा ठेकेदाराकडून भंग होत असल्याची बाब निदर्शनास येताच पालिकेने जाहिरात प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे.

ठाणे महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वारस्य अभिव्यक्ती निविदेनुसार शहरातील ३० ठिकाणी वातानुकूलीत शौचलये उभारून त्या मोबदल्यात जाहिरात प्रदर्शन करण्याचे हक्क दिले होते. त्यानुसार सिघांनिया शाळेजवळ शौचालय उभारून जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. या ठिकाणी जाहिरात फलक हा पाच वर्षांपुर्वी उभारण्यात आला. तर शौचालयाचे बांधकाम २०२५ मध्ये करण्यास सुरुवात झाली. कार्यादेश दिल्या नंतर ९ महिन्यात बांधकाम करणे बंधनकारक होते. मात्र शौचालयाची उभारणी करण्याऐवजी दोन्ही ठिकाणी जाहिरात फलक उभारून व्यवसाय करण्यात आला आहे. त्यामुळे करारनाम्यातील अटीचे उल्लंघन झाल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली. यासंदर्भात शौचालय बांधण्यास तसेच जाहिरात फलक काढून टाकण्यास वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

सद्य स्थितीत सिंघानिया शाळेजवळील पदपथावर शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, पदपथ अरूंद असून शौचालय बांधल्यास शाळेतील मुलांना आणि नागरिकांना पदपथा अभावी रस्त्याचा वापर करावा लागेल, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंघानिया शाळेच्या परिसरात नेहमीच वाहतूकीची वर्दळ असते. या परिसरात पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही अधिक वावर असतो. त्यामुळे पदपथाचा वापर पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना झाला नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत सिंघानिया शाळेजवळील आणि हिरानंदानी मेडोज येथील शौचालय आणि जाहिरात फलक काढण्याबाबत मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी तक्रार केली होती. तसेच या मुद्द्यावरून पालिकेवर टिका होऊ लागली होती. अखेर शौचालयाचे काम थांबविण्याचे आणि जाहिरात फलक काढण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया

महापालिका कारवाई करायचे सोडून कागदी घोडे नाचवते आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठेकेदार जुमानत नाहीत. यापूर्वी सुद्धा काम थांबवण्याचे आदेश देऊनही ठेकेदाराने काम केलेले आहे. जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे तसेच नागरिकांचा जीव धोक्यात आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे न्यायालयात जावे लागेल. संदीप पाचंगे, सरचिटणीस मनविसे