महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरूवारी (२० जानेवारी) कालीचरण याला अटक केली. त्याला शुक्रवारी (२१ जानेवारी) ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपी कालीचरणच्या २ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने आरोपी कालीचरणला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी कालिचरणच्या समर्थनार्थ ठाण्यात बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील सुनावणीनंतर कालिचरणला रायपूर येथील कारागृहात नेण्यात आले. कालीचरणच्या जामीनासाठी वकिलांनी न्यालयात अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी (२४ जानेवारी) सुनावणी होईल. रायपूर आणि वर्धा पोलिसांनंतर नौपाडा पोलिसांनी कालीचरणला ताब्यात घेतलं होतं. महात्मा गांधींजींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरणच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

रायपूर, वर्ध्यानंतर आता ठाणे पोलिसांकडून कालीचरणची चौकशी

जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीवरून कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची चौकशी होणार आहे. या अगोदर रायपूर आणि वर्धा पोलिसांनी कालीचरणची चौकशी केली होती. रायपूरमध्ये झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती. त्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण होतं. त्यानंतर कालीचरणवर वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

एका व्हिडीओमुळे मिळाली प्रसिद्धी

कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं. आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.

महात्मा गांधींबद्दल त्याने काय विधान केलं?

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण: कालीचरण महाराज वाद नेमका आहे तरी काय? अटक होईपर्यंत असं काय घडलंय? जाणून घ्या

छत्तीसगडच्या राजधानीत भरलेल्या धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. यावेळी त्याने गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केलं. (कालीचरण महाराज काय बोलला हे लिहिलंही जाऊ शकत नाही)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane court gives judicial custody to kalicharan in controversial statement on mahatma gandhi pbs
First published on: 21-01-2022 at 13:50 IST