कल्याण – कल्याण पूर्वेतील मलंंगगड परिसर, नेवाळी नाका, नेवाळी विमानतळ परिसर आणि नेवाळी ते बदलापूर रस्त्याच्या भागात बेसुमार बेकायदा चाळी, इमारती उभ्या राहिल्या आहेत. या बेकायदा बांधकामांमध्ये स्वस्तात घर मिळत असल्याने बांग्लादेशी घुसखोर, विविध भागातून तडीपार केलेले गुंड, अंमली पदार्थांचे तस्कर या भागात निवास करून आहेत. या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांमुळे २७ गाव, मलंगगड, ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली आहे. या भागातील ग्रामीण संस्कृतीला या गुन्हेगारी वातावरणामुळे धोका पोहचत असल्याने या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर स्थानिक पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू करावी, अशी मागणी सामाजिक आणि विविध धार्मिक उपक्रम राबविणाऱ्या भुमिपूत्र स्वाभिमानी संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी एक संशयित दहशतवाद्याला मलंगगड परिसरातील नेवाळी भागातील भाड्याने राहत असलेल्या एका बेकायदा घरातून अटक करून नेली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत स्थानिक पोलिसांनी नेवाळी परिसरातील बेकायदा चाळींमधून अनेक बांग्लादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. हे घुसखोर भारतात राहण्याचा कोणताही परवाना नसताना या भागात चोरून लपून राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घुसखोरांमुळे स्थानिक संस्कृती बिघडत असल्याने नेवाळी परिसरातील बेकायदा चाळींमध्ये स्थानिक पोलिसांनी तपास सुरू करावा, अशी मागणी महेंद्र पाटील यांनी केली आहे.

विविध भागातील तडीपार गुंड, अंमली पदार्थांचे तस्कर या भागात वावरतात. पोलिसांनी काही महिन्यापूर्वी पलावा परिसर, निळजे तलाव, काटई बदलापूर रस्त्यावरील वस्त्यांमधून कोट्यवधीची अंमली पदार्थाची तस्करी करणारे तस्कर अटक केले आहेत. कोट्यवधीचे अंमली पदार्थ या तस्करांकडून जप्त करण्यात आले आहे. हे तस्कर अनेक वेळा स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत आहेत. असेही चित्र आहे. नेवाळी हा शहराच्या एका बाजुला असलेला परिसर आहे. या भागातून नवी मुंबई, मुंबई, रायगड जिल्ह्यात रस्ते, रेल्वे मार्गाने जाता येते. त्यामुळे तस्कर, घुसखोर या भागात घर घेण्याला पसंती देत आहेत. बहुतांशी घुसखोर परिसरातील वाहन दुरूस्तीच्या कार्यशाळा, स्थानिक उद्योगांमध्ये कामगार म्हणून काम करतात.

गेल्या आठवड्यात एक सामान्य म्हणून वावरणार एक इसम संशयित दहशतवादी म्हणून दिल्ली पोलिसांनी पकडून नेला आहे. त्यामुळे नेवाळी परिसराला हा धोक्याचा इशारा आहे. याचा गांभीयाने विचार करून पोलिसांनी नेवाळी नाका भागात पोलीस चौकी सुरू करावी आणि नेवाळी परिसरातील बेकायदा चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची कसून चौकशी सुरू करावी, अशी मागणी भुमिपूत्र धर्माभिमानी संघाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.