शहाड येथील साईधाम कॉम्प्लेक्समध्ये राहणारे राकेश बाळिया यांच्या घरी सोमवारी रात्री १० वाजता चोरी झाली. त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरटय़ांनी घरातील गोदरेज कपाटातील चार लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे पश्चिमेला विठ्ठल मंदिर रोड येथे राहणारे बाळकृष्ण तिवारी हे बाहेर गेले असता त्यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरटय़ांनी त्यांच्या कपाटातील ८१ हजार किमतीचा ऐवज चोरला. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील जी. बी. रोड येथे राहणारे प्रदीपकुमार पांडे हे १० ते १४ एप्रिलदरम्यान बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातील कपाटातील १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरांनी पळविला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा
ठाणे : टेंभीनाका येथे राहणारे सतीश कोळसकर यांनी १५ फेब्रुवारीला बांधकाम व्यावसायिक राम मोहिते यास ठाण्यातील धोबी आळी येथील आनंद स्मृती या इमारतीमध्ये सदनिका घेण्यासाठी नऊ लाख साठ हजार रुपये देऊन करारनामा केला होता. मात्र मोहिते यांनी कोळसकर यांना ती सदनिका दिली नाही आणि ती दुसऱ्या व्यक्तीस विकून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मोबाइल लंपास
ठाणे : वसंत विहार येथे राहणाऱ्या चैताली चटर्जी या १५ मे रोजी सायंकाळी सात वाजता ठाणे स्थानकातील थांब्यावरून रिक्षा पकडण्याच्या तयारीत असतानाच एका व्यक्तीने त्यांच्या हातातील २२ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरला. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील गौरीपाडा येथे राहणारे गिरिधर क्षीरसागर बुधवारी दुपारी दीपक हॉटेलसमोर रिक्षाची वाट पाहत उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्याकडील २२ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाची चोरी
ठाणे : कळवा-विटावा येथील भालचंद्र पाटील चाळीत राहणारे विजय लक्ष्मण बागल हे रिक्षाचा व्यवसाय करतात. १६ एप्रिलला रात्री ९ वाजता त्यांनी विटावानगर येथील शंकर मंदिराजवळ रिक्षा पार्क करून ठेवली होती. ती चोरटय़ाने चोरून नेली. सुमारे सत्तर हजार रुपये रिक्षाची किंमत आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात मंगळसूत्राची चोरी
ठाणे : मालवण येथून सुप्रिया सावंत या नातेवाईकांच्या लग्नासाठी ठाणे येथील शिवाजीनगरमधील सेंट लॉरेन्स स्कूल हॉलमध्ये आल्या होत्या. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान काही नातेवाईकांसोबत त्या चहा पिण्यासाठी स्वाद हॉटेलजवळील रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तसेच डोंबिवली पश्चिमेतील फुले रोड येथे राहणाऱ्या वैशाली महाजन या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेतीबंदर रोड येथून प्रवास करीत असताना मोटारसायकवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत फेरिवाल्यांवर कारवाई
डोंेबिवली : गोग्रासवाडी येथे उघडय़ावर चायनिजचा व्यवसाय करणाऱ्या रमेश पटेल व दिनेश पुजारी या दोघांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. खाण्यास अयोग्य अशा खाद्यपदार्थाची विनापरवाना विक्री करण्याच्या गुन्हय़ाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. कल्याण महात्मा फुले चौक पोलिसांनीही कल्याण रेल्वे स्थानकालगत वडापाव, भुर्जीपाव विकणाऱ्या शिवकुमार राजपुत, टाविद इक्बाल हुसैन, सुनिल जाधव, शफीक शेख, सुनिल मानकर यांसह तंबाखू, पान, सिगारेट आदी विक्री करणाऱ्या अच्छेनाथ पारसनाथ परदेशी व वेलरीयण मायकल लोणो या विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल
ठाणे : नौपाडा येथे राहणाऱ्या मालती वडगावकर ही ७० वर्षीय महिला २४ मे रोजी राज्य महामंडळाच्या म्हसवड – ठाणे बसमधून पुणे-ठाणे येथे प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान त्यांच्या बाजूला बसलेल्या महिलेने त्यांना मॅँगो ज्यूस दिला. त्यानंतर मालती यांना चक्कर आली. याच संधीचा फायदा घेऊन महिलेने त्यांच्याकडील एक लाख ४२ हजार रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स चोरली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.