mumbai railway update today : ठाणे : मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून ठाणे-सीएसएमटी रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे स्थानकात अडकलेल्या खोपोली, कर्जत, कसारा, कल्याण भागातील प्रवाशांसाठी विशेष शटल सेवा रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्या आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणारे प्रवासी देखील ठाणे स्थानकात रेल्वेगाडीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र होते.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे मार्गावर बसला आहे. मुंबई उपनगरात ठिकठिकाणी पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाणे ते सीएसएमटी या महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला तसेच मुंबईच्या इतर महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.
मुसळधार पावसामुळे शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु अनेक खासगी कंपन्यांची कार्यालये सुरु आहेत. कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदाराला त्याचा परिणाम सहन करावा लागला. ठाणे- सीएसएमटी रेल्वे सेवा तात्पुरती बंद झाल्याने अनेक नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकात अडकून होते. दरम्यान, या प्रवाशांसाठी ठाणे ते कर्जत-कसारा या विशेष शटल सेवा सुरू केल्या आहेत. मात्र या सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस दलाचे जवान नागरिकांना गरज नसल्यास मुंबईत प्रवास करु नये अशा सूचना करत होते.
ठाणे रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या प्रवाशांना उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्यामुळे ठाणे स्थानकातून परराज्यात किंवा राज्यातील इतर भागात निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
रेल्वेचे म्हणणे काय
– मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई उपनगरातील रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे सीएसएमटी आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. ठाणे – कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे.