ठाणे : कुटुंब प्रमुख असलेल्या महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पहिल्या दिवशी ५० महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन होते. परंतु २७९ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी या अभियानास महिलांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले.

ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. प्रसाद पाटील यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली. हा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याबरोबरच नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिरला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. या अभियानातंर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलदगतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

काय आहे अभियान

गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. परंतु महिला कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबीरात करण्यात येणार आहे. यासाठी सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येत आहे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रसाद पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभियानास प्रतिसाद

पहिल्या दिवशी ५० महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन होते. मात्र, याठिकाणी तपासणीसाठी महिला मोठ्या संख्येने आल्या. त्यामुळे सर्वच म्हणजेच २७९ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सहा महिन्यांपूर्वी ९ ते १४ वयोगटातील २९१ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. त्यापैकी १२७ मुलींना अभियानात दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात आली. रोटरी क्लबतर्फे ही लस देण्यात आली. ठाणे महापालिका शाळेत अंदाजे ४ हजारांच्या आसपास मुली आहेत, त्यांना ही लस देण्यात येत आहे. प्रभाग समिती निहाय स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्यासाठी आशा सेविकांची मदत घेण्यात येत आहे.