ठाणे – देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्यात यावे. तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत. यासोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेलया सायरनची नियमित तपासणी करणे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करण्यात यावी. तर जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी प्रशासनातील सर्व संबंधित विभागांना दिले आहे. तर प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रजेवरून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.
देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
“आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे. देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी. जशी वेळ येईल, तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागेपुढे पाहू नका,” – अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे</strong>