ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीसह गुणवत्ता वाढीसाठी जिल्हास्तरावर ‘क्वालिटी समर फनकॅम्प’हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासह त्यांची आकलन क्षमता वाढण्यास मदत होत आहे. तसेच वेळेचे महत्त्व त्यांना समजू लागत आहे. विशेष म्हणजे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांसाठी तयार होत असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन दिशा प्रकल्प राबविला जात आहे. असे असतानाच आता, राष्ट्रीय गुणवत्ता प्रोत्साहन मंडळ (नॅशनल बोर्ड ऑफ क्वालिटी प्रमोशन) आणि भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्या वतीने “क्वालिटी चॅम्पियन्स : स्मॉल स्टेप्स, बिग इम्पॅक्ट” या संकल्पनेवर आधारित “क्वालिटी समर फनकॅम्प” हा उपक्रम राबविला जात आहे.
एप्रिल २०२५ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून २० जुलै २०२५ पर्यंत हा उपक्रम पार पडणार आहे. या उपक्रमात वयवर्षे १८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अन्न, निवास, आरोग्यसेवा, शिक्षण आणि शाश्वता यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. निबंध लेखन, चित्रकला, लघु व्हिडिओ निर्मिती, ते स्वत: करा (डू इट युअरसेल्फ) आणि क्वालिटी क्विझ यांसारख्या सर्जनशील स्पर्धा या उपक्रमात पार पडत आहे. या स्पर्धांमुळे गुणवत्तेचे महत्त्व प्रभावीपणे व्यक्त करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे, अशी माहिती शिक्षणविभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी होण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार, भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) च्या मदतीने जिल्ह्यातील आठ शाळांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. या शाळांमधील १०० हून अधिक विद्यार्थी स्वः इच्छेने उपक्रमात सहभागी झाले असून त्यांचा या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
तीन दिवस पार पडणार गुणवत्ता जागरूकता कार्यशाळा
“क्वालिटी चॅम्पियन्स : स्मॉल स्टेप्स, बिग इम्पॅक्ट” या संकल्पने अंतर्गत ठाणे जिल्ह्यात १६ जून ते १८ जून याकालावधीत भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्या वतीने गुणवत्ता जागरूकता कार्यशाळा (क्वालिटी अवेरनेस वर्कशॉप) पार पडणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या दहा शाळांची निवड करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक जीवनकौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या व्यवहार ज्ञाना संदर्भात त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जे त्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.