ठाणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, गणेशोत्सव नागरिकांना आनंदात, निर्विघ्न साजरा करता यावा यासाठी ठाणे पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या कालावधीत सात ते आठ हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यामध्ये राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथके, शीघ्र कृती दल, गृहरक्षक यांचाही सामावेश असणार आहे. संवेदनशील भागात गैरप्रकार टाळण्यासाठी या भागात पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे शहर पोलिसांच्या हद्दीत येतात. गणेशोत्सवाच्या कालावधीत या शहरांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून मोठ्याप्रमाणात उत्सव साजरा केला होता. यावर्षी या शहरांमध्ये एक हजार ६० सार्वजनिक गणेशमूर्तींची तर, लाखो नागरिकांच्या घरात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून सात ते आठ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा ठिकठिकणी तैनात असणार आहे.
ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच भिवंडी, मुंब्रा या सारख्या शहरात शांतता समितीच्या बैठका घेतल्या. तसेच नागरिकांना एकोपा राखण्याचे आवाहन केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसाच्या पथकांचे लक्ष असून व्हाॅट्सॲप किंवा इतर समाजमाध्यमावर अफवा, धार्मिक भावना दुखावतील असे संदेश प्रसारित होऊ नये यासाठी पोलीस सतर्क आहेत.
ठाणे पोलीस दलाकडे राज्य राखीव दलाची एक तुकडी आहे. असे असले तरी आणखी तुकडी मागविली जाणार आहे. यासोबतच ८०० गृहरक्षक (होमागार्ड), इतर पोलीस दलातील १० पोलीस निरीक्षक, २० साहाय्यक पोलीस निरीक्षक, ५५ उपनिरीक्षक आणि रेल्वे पोलीस दलातील ५० कर्मचाऱ्यांची कुमूक देखील पाचारण केले जाईल. दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी माॅकड्रिल देखील पोलिसांनी केले.