ठाणे: जिल्हा परिषदेच्या ‘डिजिटल ग्रामशासन’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत ९ हजार ४७७ मालमत्तांची नोंद ऑनलाईन प्रणालीमध्ये अद्ययावत केली जात आहे.या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीकडील इमारती, मोकळी जागा, खुली भूखंडे, इमारतीविना असलेल्या जमिनी, तसेच जंगम मालमत्तांचे सर्वेक्षण करून https://zpthanemalmattakosh.com या संकेतस्थळावर माहिती नोंदवण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी सांगितले की, “सध्या मालमत्तेची अद्ययावत माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायतींचे संपत्ती व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल.”
मालमत्तांची अचूक माहिती ही स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेची गुरुकिल्ली आहे. ही प्रणाली केवळ नोंद ठेवण्यासाठीच नव्हे तर मालमत्तेच्या संरक्षण, नियोजन, देखभाल आणि उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. डिजिटल ग्रामशासनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.