ठाणे – उद्योग समूहांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबरनाथ, ठाणे, शहापूर आणि मुरबाड येथील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रात वीज खंडित होणे, रस्ते, गटार यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्था नसणे, वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची पार्किंग व्यवस्था याबाबत सर्व संघटनांनी एकमुखाने जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यामुळे एकीकडे राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेणारा जिल्हा म्हणून नावारूपाला येत असलेल्या जिल्ह्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा देखील मिळत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वाढीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी त्यांनी उद्योगांसाठी असलेल्या सकारात्मक बाबींचा उल्लेख करून, उद्योगवाढीला चालना देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील विद्यमान उद्योग बाहेर जाऊ नयेत आणि नव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच नियोजनबद्ध उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

रेडीमेड गारमेंट उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत विकास आराखडा मंजूर करण्यात आला. उद्योजकांना आवश्यक सहाय्याबाबत चर्चा झाली. तसेच, उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र समिती सक्रियपणे काम करेल असे स्पष्ट करण्यात आले.

उद्योगांचे नुकसान थांबवाठाण्यातील टिसा आणि कोसिआ संघटनांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. खिडकाळीश्वर भागात वादळी पाणी व सांडपाणी व्यवस्थेसाठी रस्त्याखाली पाइपलाइन टाकावी. पाणीपुरवठा बंद करण्यापूर्वी किमान आठवडाभर आधी सूचना द्यावी, जेणेकरून उद्योगांचे नुकसान टळेल. वागळे इस्टेटमधील रस्ता क्र. २६ वरील अनधिकृत कचरा डेपो त्वरित हटवावा, कारण यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात येत असून उद्योगांची प्रतिमाही मलिन होते. तसेच, ठाणे ईपीएफओ कार्यालयातील यूएएन अर्ज मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब व नकाराची समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.

वाढती ट्रक कोंडी

मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने औद्योगिक विकासासाठी काही तातडीच्या मागण्या केल्या आहेत. वारंवार वीजखंडितीवर तोडगा म्हणून खासगी वीज वितरणास परवानगी किंवा भूमिगत केबल्स घालाव्यात. एमआयडीसीतील रस्ते रुंद व आरसीसीमध्ये बांधून भूगर्भातील केबल्स सुरक्षित कराव्यात. वाढत्या ट्रक वाहतुकीमुळे कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र ट्रक टर्मिनस उभारावा. तसेच मुरबाड–शहापूर रस्त्यातील अपूर्ण भाग, विशेषतः कुडावळी एमआयडीसीबाहेरील तीन किमीचा टप्पा, तातडीने पूर्ण करून तो समृद्धी महामार्गाशी जोडावा, अशी मागणी करण्यात आली.

पायाभूत सुविधा नाही

अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स संघटनेच्या वतीने अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे स्पष्ट केले. एमआयडीसीने भूखंड वाटप करताना रस्ते व नाले, सांडपाणी यांसारख्या मूलभूत सोयी पूर्ण केल्या नसल्याने उद्योगधारकांना त्रास होत आहे. गेल्या वर्षभरात दररोज १ – २ तास वीजखंडित होत असून उद्योगांचे नुकसान वाढले आहे. तसेच कटाई नाका ते बदलापूर एमआयडीसी रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असून वाहतूक कोंडी होत असल्याची समस्या अधोरेखित करण्यात आली.

सातत्याने वीज खंडित

पुंधे शहापूर औद्योगिक संघटना शहापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार वीजखंडिती, पाणीपुरवठ्याची अपुरी पाइपलाइन व्यवस्था आणि टँकरवरील अवलंबित्व यामुळे उद्योगांना फटका बसत आहे. सुमारे ३ हजार उद्योगांसाठी पूर्ण क्षमतेचे अग्निशमन केंद्र तातडीने उभारावे, लघुउद्योगांचे वीजदर कमी करावेत आणि शहापूरला ‘सी’ झोनऐवजी ‘डी ’ झोनमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी संघटनेने केली.