बदलापूरः राज्याच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला नवा मंत्री मिळाला आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागाने १६ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आशिष दामले यांना मंत्री दर्जा आणि सोयी सुविधआ देण्यात आला आहे. राज्याच्या महामंडळाचे अध्यक्ष हे पदसिद्ध राज्यमंत्री असतात. मात्र आशिष दामले यांना परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री दर्जा बहाल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे. त्यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. राजकीय दृष्ट्या या निर्णयामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचाही समावेश झाला आहे. त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महायुतीला भरघोस मते मिळाल्यानंतर त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर बसले. सरकार स्थापन झाल्यानंतर महामंडळांचेही समसमान वाटप करण्यात आले. त्यानुसार राज्यातील ब्राम्हण वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजप आणि इतर महायुतीतील पक्षांना याची कुणकुण लागण्यापूर्वीच यावर बदलापूर येथील आशिष दामले यांची वर्णी लावण्यात आली.

आशिष दामले हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आणि विशेषत पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या या निवडीने अनेकांना धक्का बसला. आशिष दामले यांनी या नव्या मंडळाच्या कामाला सुरूवात केली होती. राज्यातील महामंडळाचे अध्यक्ष हे पदसिद्ध राज्यमंत्री असतात. त्यांना तसा दर्जा मिळतो. नव्याने स्थापन झालेल्या या मंडळाला नव्याने अधिकाऱ्यांचीही मदत देण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनंतर आता या मंडळाचा कारभार सुरू आहे. दामले राज्यभर फिरून मंडळाचे काम करत असतानाच आता राज्य सरकारने आशिष दामले यांना मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे.

राज्याच्या नियोजन विभागाने मंगळवारी कॅबिनेट बैठकीच्याच दिवशी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाही एक मंत्री असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या आता चारवर पोहोचली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह आता आशिष दामले हे चौथे मंत्री ठरणार आहेत. त्यामुळे राजकीय पातळीवरही प्रभाव पडेल अशी चर्चा रंगली आहे.

याबाबत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या वर्षभरात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ८० पेक्षा अधिक दौरे करून राज्यभरात वेगवेगळ्या स्तरावरचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यातून मिळालेला प्रतिसाद आणि प्रेम हे भरघोस आहे. प्रतिकुल परिस्थितीत राज्यात जातीय सलोखा राहावा यासाठी प्रयत्न केले. महामंडळाचे आणि माझे पहिले कर्तव्य जातीय सखोला राखण्याचे आहे, त्यात मला यश मिळते आहे, अशी प्रतिक्रिया आशिष दामले यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.

मी ब्राम्हण असलो तरी आई गुजराती, पत्नी मराठा आहे. मी ज्या प्रभागातून नगरसेवक झालो होतो तेथे मला मागासवर्गीय आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा मिळाला. हाच पाठिंबा मला कामी आला असून पुढेही यासाठी मी काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशीही भावना दामले यांनी व्यक्त केली आहे.