कल्याण – अलीकडे कोणताही सण असो झेंडुंच्या फुलांना विशेष मागणी असते. पण, प्रत्येक फुलाचे सणवाराप्रमाणे महत्व आहे. वेळेत आवश्यक फुले सणावाराप्रमाणे उपलब्ध होत नसल्याने सहज उपलब्ध होणारी झेंडुची फुले देवाला वाहण्यास भाविक प्राधान्य देतो. शहरी भागात नवरात्रोत्सवात खुरासणीची फुले मिळणे दुरापास्त असते. पण, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात देवी, घरातील घटांना गाव खेड्यातील, आदिवासी भाविक सुवास, सुगंध नसताना पिवळी धम्मक मध्यभागी लालगोंडा असलेल्या खुरासणीच्या फुलांना सर्वाधिक प्राधान्य देतात. या फुलाचे पारंपारिक कथांप्रमाणे काही महत्व आहे, अशी माहिती ग्रामीण, आदिवासी भागाचे अभ्यासक प्राचार्य गोपाळ गोखंडे यांनी दिली.
प्राचार्य वेखंडे शहापूर तालुक्यातील किन्हवली तालुक्यातील शहा चंदुलाल स्वरुपचंद विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आहेत. आदिवासी, ग्रामीण भागात नवरात्रोत्सव काळात खुरासणीच्या फुलांना खूप महत्व असते. मोठ्या फूल बाजारात ही फुले सहज उपलब्ध होत नाहीत. या फुलांना सुगंध नसतो. गणेशोत्सव ते दिवाळी खुरासणी फुलांच्या बहरण्याचा काळ असतो. नवरात्रोत्सव काळात या फुलांना बहर आलेला असतो. खुरासणीच्या झाडाचे पान, फूल हाताने कुस्करले तर उग्र वास हाताला येतो, असे प्राचार्य वेखंडे यांनी सांगितले.
खुरासणीचे महत्व
ग्रामीण, आदिवासी जीवन शेतीवर अवलंबून असते. दिवसभर आदिवासी गावपाडे, घनदाट जंगलातील शेतीत जाऊन शेतकरी राबत असतो. जंगली रानटी, हिंस्त्र प्राण्यांची भीती शेतकऱ्यांना असते. अलीकडे जंगलांमधील माणसांचा वावर कमी झाला आहे. त्यामुळे आदिवासी, गावपाड्यांवर अलीकडे बिबट्या, वाघांचा सहज संचार वाढला आहे. वाघाच्या पोटाखालची कातडी नाजूक असते. याची जाणीव असल्याने वाघ कधीच काटेरी झडुप, पोटाला इजा होईल अशा ठिकाणाहून संचार करत नाही.
खुरासणीच झाड दोन ते तीन फुटाचे असते. शेतकऱ्याने माळरानावर पठ्यामध्ये ( माळाचा खुरपलेला सखल पट्टा) भातशेती लगत खुरासणीच्या बियांची जून, जुलैमध्ये लागवड केलेली असते. ही रोपे गणेशोत्सव काळात तरारून मोठी होऊन त्याला फुले येऊ लागतात. नवरात्रोत्सव ते दिवाळी काळात खुरासणीच्या फुलांचा बहर असतो. या फुलांच्या गोंड्यांमध्ये बी तयार होऊन त्या बियाचे शेतकरी नंतर खाण्यासाठी तेल काढतो.
खुरासणीचे तीन फुटाचे रोप खुरटे आणि त्याला धारदार बारीक टोकदार फांद्या असतात. या काड्या आणि खुरासणीच्या फुलांच्या उग्र, हारवस दर्पामुळे वाघ या झाडापासून नेहमी दूर असतो. त्यामुळे शेतावर काम करताना वाघ दिसला तर शेतकरी जीव वाचविण्यासाठी खुरासणीच्या लागवडीमध्ये लपून बसतो. खुरासणीची फुले शेतकऱ्यांचे जंगलात रक्षण करत असल्याने या फुलांना देव्हाऱ्यात मान मिळावा म्हणून घटस्थापनेच्या काळात घरातील देवीच्या घटांना खुरासणीची माळ दररोज अर्पित केली जाते, अशी पारंपारिक कथा आहे. गणेशोत्सवानंतर जास्वंद, पारिजातक इतर फुलांचा बहर ओसरला की नवरात्रोत्सवात ग्रामीण, आदिवासी भागात देवीला वाहण्यासाठी फुले नसायची. या काळात खुरासणीच्या फुलांचा बहर असल्याने नवरात्रीत ग्रामीण भागात खुरासणी फुलांना महत्व असते, असेही प्राचार्य वेखंडे यांनी सांगितले.
घटस्थापनेत आदिवासी भागात महिला खैर, साग झाडांच्या टिपऱ्या घेऊन भोंडल्याची गावोगावी जाऊन गाणी गात. यामध्ये ‘घट बसले बरसले, घट अमृताचे, माळा ओवल्या, ओवल्या, पिवळ्या खुरासणीच्या’,. ‘अलक पलक भोंडावे, खटक टिपस खैराचा, आमच्या भोंडाईला जिंकू घातले, आमच्या तोंडाला शिंकू घातल,’ अशा गाण्यांचा समावेश असायचा. आपली ग्राम्य, आदिवासी संस्कृती टिकवणारे हे पारंपारिक प्रकार आता मागे पडत आहेत, अशी खंत प्राचार्य वेखंडे यांनी व्यक्त केली.