Special Buses For Ganeshotsav 2025 ठाणे – गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये आतापर्यंत २ हजार ६७१ इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २०६ बसगाड्यांची जादा नोंदणी झाली आहे.
कोकणात गणेशोत्सव, शिमगोत्सव, होळी हे सण पारंपारिक पद्धतीने साजरे होतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अधिक संख्येने राहतात. परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मुळ गावी जातात. या सर्व प्रवाशांची कोणतीही गैरसयोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि एसटी विभाग दरवर्षी अधिकच्या गाड्यांचे नियोजन करत असते. यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दी विना कोकणात जाता येते.
तसेच या अधिकच्या गाड्यांच्या नियोजनामुळे रेल्वे आणि एसटीला प्रवाशांच्या तिकीट आरक्षणातून मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळते. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने नागरिकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या ठाणे विभागाकडून ०२ हजारहून अधिक बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत २ हजार ६७१ इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २०६ बसगाड्यांची जादा नोंदणी झाली आहे. त्यात काही बसगाड्या या राजकीय नेत्यांनी आरक्षित केल्या आहेत.
ठाणे विभागाला इतर विभागांतून २ हजार ४५८ गाड्यांची मदत मिळणार आहे. यात कोकण गणेश मंडळ, आरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या बसगाड्या तसेच गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.
सात आगारांतून गाड्या
ठाणे विभागाच्या सात आगारांतून गणेशोत्सवासाठी चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, लांजा, मंडणगड, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी जादा बसगाड्या सोडण्यात येतील.
गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे कोकणातच सर्वाधिक गाड्या सोडल्या जातात. यामुळे इतर जिल्ह्यांसाठी गाड्या शिल्लक राहत नाहीत. यासाठी इतर जिल्ह्यातील प्रवाशांची संख्या पाहून त्या मार्गावर बसगाड्या सोडण्यात येतील.- सागर पळसुले, ठाणे एसटी विभाग नियंत्रक