कल्याण – जनरल एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या कल्याण पश्चिम जोशी बाग येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयाशी संलग्न महिला महाविद्यालयातर्फे ठाणे, डोंंबिवली, कल्याण परिसरातील विविध शाळांमधील उपक्रमशील ७० महिला शिक्षिकांना त्यांच्या शिक्षण सेवेतील उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र करनकाल आणि आयुष ॲकेडमीच्या संचालिका आदिती अजय चौधरी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील बहुतांशी शाळांमध्ये पुरूष शिक्षिकांबरोबर महिला शिक्षिकाही अधिक संख्येने विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. या शिक्षिकांमधील अनेक शिक्षिका विविध प्रकारचे विद्यार्थी, शालेय हिताचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता, त्यांची कौशल्ये वाढविण्याचे काम करतात. क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर शिक्षिका आवड म्हणून हे काम करतात. अशा गुणवंत महिला शिक्षिकांचा शिक्षक दिनी सन्मान करावा म्हणून जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. करनकाल आणि आयुष ॲकेडमीच्या प्रमुख आदिती चौधरी यांनी महिला शिक्षिकांच्या सन्मानाचे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यामधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.

डोंबिवलीतील छत्रपती शिक्षण मंडळाच्या श्री. रा. साठे विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या चिटणीस भारती वेदपाठक, मुख्याध्यापिका मंदाकिनी पोखरकर, रेश्मा देशपांडे, निलिमा वैद्य, महिला शिक्षिका मृणाल खेडकर, नितुशा हेडावु, पल्लवी चौधरी, आश्लेषा जाधव, संपदा पोतकर, नयना गवारी, मीनाक्षी शिर्के, उमा देसाई, सुवर्णा मागाडे आणि शिक्षक दत्तात्रय कौल्हे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक शाळांमधील ७० शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक राजेंद्र राजपूत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती लोहार, संस्थेचे कार्यवाह विकास पाटील, प्राचार्य डाॅ. राजेंद्र करनकाल, आदिती चौधरी, सुभेदार ॲकेडमीचे प्रमुख परब उपस्थित होते.

शाळांमध्ये इतर शिक्षिकांबरोबर महिला शिक्षिकाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत. घर, शाळा अशा अनेक आघाड्या सांभाळून तारेवरची कसरत करत शिक्षिका ही जबाबदारी पार पाडतात. आपल्या शाळेचा विद्यार्थी संस्कार, गुणवत्ता, इतर कौशल्यांमध्ये आघाडीवर असावा म्हणून शिक्षिका तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरिय विज्ञान, मुल्याधिष्ठीत, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आपल्या शाळांमधील मुलांना सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या प्रयत्नांमधून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सार्वजनिक व्यासपीठावर दाखविणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अशा शिक्षिकांचा सन्मान होणे गरजेचे होते, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी सन्मान प्राप्त शिक्षिकांच्या कार्याचा गौरव केला.