कल्याण : शहापूर तालुक्यातील कसारा जवळील सह्याद्री डोंगर रांगाच्या भागात फुगाळे गाव हद्दीत गुरुवारी दुपारी जंगलात रानमेवा खाण्यासाठी गेलेल्या मुलांना जमिनीवर ड्रोन आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विमानासारख्या दिसणाऱ्या या ड्रोनची माहिती ग्रामस्थांनी तातडीने कसारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या ड्रोन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. दरम्यान हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानवर हवाई हल्ला चढविला. तसेच, पाकिस्तानकडून अनेक ड्रोन भारताच्या दिशेने सोडण्यात आले होते. हे ड्रोन भारतीय हवाई दलाने हवेत नष्ट केले. ही सर्व परिस्थिती अद्याप ताजी असतानाच्या काळात कसारा घाट परिसरातील फुगाळे गाव हद्दीत सह्याद्री डोंगर रांगांच्या जंगलात जमिनीवर सुस्थितीत अवस्थेतील ड्रोन आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
फुगाळे गावातील शाळकरी मुले गुरुवारी दुपारी शाळांना सुट्टी लागली असल्याने गाव परिसरातील जंगलामध्ये करवंद, आंंबे आणि इतर रानमेवा खाण्यासाठी फिरत होती. जंगलात फिरत असताना दूरवरून एक विमानासारखी प्रतिकृती जंगलात पडली असल्याचे त्यांना दिसले. सुरूवातीला ही मुले ही विमान सदृश्य वस्तू पाहून घाबरली. त्यांनी धाडस करत या प्रतिकृतीच्या जवळ जाऊन पाहणी केली. त्यांनी बारकाईने निरीक्षण केले तर हा ड्रोन असून तो निकामी होऊन पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलांनी ही माहिती तात्काळ गावात येऊन ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी ही माहिती कसारा पोलिसांना दिली.
कसारा पोलिसांनी सुरक्षिततेचा विचार करून तातडीने फुगाळे गावातील जंगलात धाव घेतली. या साधनाची बारकाईने तपासणी केली. हा ड्रोन असल्याचे दिसून आले. या ड्रोनवर स्ट्रीव्हर मिनी कंपनीचे नाव लिहिण्यात आले आहे. ड्रोन जमिनीवर पडला असला तरी त्याची कोणतीही मोडतोड झाली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. तसेच हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असून तो वैतरणा विभागात सर्वेक्षण कामासाठी वापरण्यात येत होता. त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे तो खाली पडला अशी बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
जलसंपदा विभागाकडून नदी पात्राचे सर्वेक्षण सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे तो ड्रोन पडला असावा. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मिलिंद शिंदे पोलीस उपअधीक्षक, शहापूर, ठाणे ग्रामी