ठाणे : ठाण्यातील कापूरबावडी भागात भटक्या श्वानामुळे दुचाकीचे नुकसान झाल्याने एका व्यक्तीने श्वानाच्या पायावर फरशी टाकून त्याला दुखापत केली. याप्रकरणी श्वान प्रेमी महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी एका दुचाकीच्या चाकातील रिंगमध्ये भटक्या श्वानाचे तोंड अडकले होते. परिसरातील नागिरकांनी त्या श्वानाचे तोंड रिंगमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे तोंड रिंगमधून निघत नव्हते. अखेर परिसरातील नागरिकांनी याची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. पथक घटनास्थळी दाखल झाले. चाकाची रिंग तोडावी लागणार असल्याचे पथकाने दुचाकी मालकाला सांगितले. त्यावेळी त्याने होकार दिला. त्यानंतर त्या श्वानाचे तोंड रिंगमधून बाहेर काढणे शक्य झाले. या घटनेनंतर दुचाकी मालक त्या भटक्या श्वानाला दगड फेकून मारत असे.

हेही वाचा – भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

हेही वाचा – मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी तो भटका श्वान परिसरात झोपला असताना त्या व्यक्तीने श्वानाच्या पायावर फरशी टाकली. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी श्वानाला का मारले याबाबत त्या व्यक्तीला विचारले असता, त्या श्वानामुळे माझ्या दुचाकीचे नुकसान झाले असे त्याने सांगितले. या घटनेनंतर परिसरातील एका श्वान प्रेमी महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.