ठाणे : मुंब्रा येथील रेल्वे अपघातात उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या दोन वरिष्ठ अभियंत्यांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अभियंत्यांनी अंतरिम अटक पूर्व जामीनासाठी काही दिवसांपूर्वीच वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणारी आणि सीएसएमटी येथून कर्जतच्या दिशेने वाहतुक करणारी रेल्वेगाडी एकाचवेळी आल्यानंतर अपघात झाला होता. या घटनेत एकूण आठ प्रवासी रेल्वे रुळांवर पडले. तर सहा प्रवासी रेल्वेगाडीच्या डब्यात पडून जखमी झाले. रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला.
‘व्हिजेटीआय’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात अभियंत्यांकडून रेल्वे रुळांची तपासणी तसेच त्याचे देखभाल केली नसल्याने ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. समर यादव आणि विशाल डोळस या दोघांनीही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गुरुवारी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी प्रलंबित होती. मंगळवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.
