ठाणे : ठाणे तसेच घोडबंदर भागातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने प्रस्तावित काळू धरणाच्या कामाला गती द्यावी तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
ठाणे महापालिकेचे स्वतःचे धरण नाही. यामुळे घोडबंदर वासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून धरणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ठाणे शहरात पाणी बंदनंतर निर्माण होणारी पाणी टंचाई आणि घोडबंदर परिसरात मोठमोठ्या गृहसंकुलामुळे जाणवणारी भीषण पाणी समस्या यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी काळू धरण प्रस्तावित करण्यात आले. परंतु मागील अनेक वर्षांपासून काळू नदीवरील प्रस्तावित धरणाला लवकरात लवकर गती देण्याची मागणी मृणाल पेंडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच प्राधान्य दिले असून ठाणेकरांच्या अपेक्षा मुख्यमंत्री नक्की सोडवतील असा विश्वास पेंडसे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई ते ठाणे अंतर अवघे ४५ मिनिटे इतकेच आहे. परंतू वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील जवळपास ७० टक्के नागरिक दररोज नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबईसह इतर ठिकाणी जातात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना नियोजित वेळेत पोहचण्यासाठी दोन ते अडीच तास लागत असून त्यातच मेट्रो प्रकल्प आणि पुर्व मुक्त मार्ग ठाण्यापर्यंत विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश आपण संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना द्यावेत अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली.
