Thane Blood Shortage: ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा झपाट्याने घटत असून सध्या केवळ पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्तदात्यांची संख्या घटली आहे, ज्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनापाठोपाठ मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी सामाज माध्यमांवरून ठाणेकरांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करत मोठी घोषणा केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा झपाट्याने कमी झाला असून सध्या फक्त पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे झालेली नसल्यामुळे रक्तदात्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, गर्भवती महिला आणि डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना आवश्यक तेवढे रक्त उपलब्ध न राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीवर आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान

एका व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे सर्व महत्त्वाचे घटक बाजूला करून पाच लोकांचा जीव वाचविला जाऊ शकतो. म्हणूनच “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असे मानले जाते. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले आहे. तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करू इच्छिणाऱ्या संस्थांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.

पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येऊया

मनसे नेते अविनाश जाधव यांनी समाजमाध्यमांवरून ठाणेकरांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, ठाण्यात सध्या फक्त पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असून ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण सर्व ठाणेकर जागृत आहोत. त्यामुळे पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून या संकटावर मात करणे गरजेचे आहे, असे जाधव यांनी म्हटले.

रक्ताचा महा कुंभ मेळावा

जर ठाण्यात रक्ताचा पुरवठा कमी पडत असेल, तर युवक आणि नागरिकांनी मागे न राहता मोठ्या संख्येने रक्तदान केले पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र येऊन ठाण्यात पुढील एक वर्ष पुरेल इतका रक्तसाठा जमा करावा, असे त्यांनी सांगितले. येत्या रविवारी ठाण्यात “रक्ताचा महा कुंभ मेळावा” आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करत या मेळाव्याचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.