ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. घोडबंदर भागातील अनेक गृहसंकुलामधील रहिवाशी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी टंचाई समस्येमुळे शहरातील नागरिक मेटाकुटीला आले असतानाच, आता गेल्या 9 वर्षांपासून ठाण्यात अधिकाऱ्यांच्या कृपेने दररोज ६० दशलक्ष लीटर इतकी पाणीचोरी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणीचोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान उपस्थित होते.
दररोज ६० दशलक्ष लीटर पाणीचोरी
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघुधरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते. शुद्ध केलेले हे पाणी माणकोली येथील एमबीआरमध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरीत करण्यात येते. पिसे धरणातून ठाणे महानगरपालिका सुमारे २८० ते ३१० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. मात्र, प्रत्यक्षात ठाणेकरांना २५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होत आहे. या मागे दररोज होणारी ६० दशलक्ष लीटर पाणीचोरी हे मुख्य कारण आहे, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला.
व्हाॅल्वला बेकायदेशीरपणे टॅपिंग
पिसे ते टेमघर दरम्यान सोनाळे, चौधरपाडा, बापगाव, मुठवळ, सावद, आमनेपाडा, किरवली, पिसे आणि देवरूंग ही गावे आहेत. या गावांच्या परिसरात असलेल्या एअर व्हाॅल्वला बेकायदेशीरपणे टॅपिंग करण्यात आलेले आहेत. त्यामाध्यमातूनच ही पाणीचोरी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
देवरूंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी बेकायदेशीरपणे चार इंचाची जोडणी करण्यात आलेली आहे. मुठवल गावातील डिलीव्हरी कंपनी, जय महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन कंपनी यांना बेकायदेशीरपणे ६ इंचाची जोडणी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच दररोज सुमारे ६० दशलक्ष लिटर्सची पाणीचोरी होत आहे.
मोठ्याप्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार
गेली नऊ वर्षे पाणी चोरीचा प्रकार सुरू आहे. दरमहा १८०० दशलक्ष लिटर्स याप्रमाणे वर्षाला २१ हजार ६०० आणि गेल्या ९ वर्षात १ लाख ९४ हजार चारशे दशलक्ष लीटर पाण्याची चोरी केली जात आहे. कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता (प्रकल्प) यांच्या संगनमताने हा पाणीचोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठ्याप्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आपणाला संशय आहे. त्यासाठीच पिसे ते टेमघर दरम्यान पाणीगणक यंत्रणाही बसविण्यात आलेली नाही, असेही मनोज प्रधान म्हणाले.
टॅप उखडून टाकण्याचा इशारा
पाणीचोरी थांबवावी, यासाठी आपण १६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर ४० ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही दिले आहे. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दररोज होणाऱ्या ६० दशलक्ष लिटर्स पाण्याची चोरी रोखली तर एका विभागाची पाणी टंचाई कमी होऊ शकते. त्यामुळे संबधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येत्या आठवडाभरात जर ही बेकायदेशीर पाणी चोरी रोखली नाही तर या ठिकाणी जाऊन सर्व टॅप उखडून लावू, असा इशाराही प्रधान यांनी दिला.
