सणासुदीला घराघरांत काही विशिष्ट खाद्यपदार्थ हमखास बनविले जातात. लाडू, पुरणपोळी, गूळपोळी आदी अनेक पदार्थाना विशिष्ट सणाचा संदर्भ आहे. मात्र हल्ली हे पदार्थ तसे बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. ठाण्यातील पाचपाखाडी विभागातील ऋतू फूड्समध्ये असेच पारंपरिक चवीचे वैशिष्टय़पूर्ण पदार्थ मिळतात.

पुरणपोळीप्रमाणेच अनेक महाराष्ट्रीय घरांमध्ये गूळपोळी बनवली जाते. तुपाची धार टाकलेली गरमागरम गूळपोळी समोर आली की गोड खाणे आवडणाऱ्या मंडळींची ब्रह्मानंदी टाळीच लागते. ऋतू फूड्समध्ये आपल्याला अस्सल घरगुती चवीची गूळपोळी मिळते. त्याचबरोबर सांजापोळी हा पदार्थही मिळतो. आता काही सुगरणी सोडल्या तर सांजापोळी फारशी कुणी बनवीत नाही. अनेकांना तर अशी कुठली पोळी आहे, याचाही पत्ता नसतो. मात्र ऋतू फूड्समध्ये सांजापोळी मिळते. गरमागरम गोड शिरा केला जातो. त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या पोळ्या लाटून त्यात सारण म्हणून सांजा घातला जातो. खाल्ल्यानंतर बराच काळ सांजापोळीची चव जिभेवर रेंगाळत राहते. सांजापोळीप्रमाणे येथे खजूरपोळी हा आणखी एक वेगळा पदार्थ मिळतो. तो खाण्यासाठी लांबून खवय्ये येतात. गव्हाच्या पिठाची पोळी तयार केली जाते. त्या पोळीमध्ये बारीक केलेले खजूर टाकले जातात. त्यानंतर ती पोळी लाटून तव्यावर छान खरपूस भाजली जाते. येथील पुरणपोळीही तितकीच प्रसिद्ध आहे. खवापोळीसाठी तर येथे खवय्यांची प्रचंड गर्दी होते. दररोज ही खव्याची पोळी करीत असल्याने ताजी पोळी खाण्याचा मनसोक्त आनंद खवय्ये घेतात. लाडू हा प्रकार दिवाळी किंवा शुभकार्यात नेहमीच घराघरांत केला जातो. मात्र येथील लाडू पौष्टिकतेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. आळीव, लाही, राजगिरा, नाचणी आदी पदार्थ पौष्टिक असल्याने दिवसभरातून एक लाडू खाल्ला तर त्यातून चांगले सत्त्व पोटात जाते. लहान मुलांना हमखास हे लाडू दिले जातात. पंचामृत लाडूमध्ये शिंगाडय़ाचे पीठ, साबुदाणा पीठ, राजगिरा, लाही, पिठीसाखर, आळीव आदींचे मिश्रण असते. पौष्टिक पंचामृत या लाडवामध्ये नाचणी सत्त्व, आळीव, सोयाबीन, राजगिरा, लाही, पिठीसाखर आदी पदार्थाचा समावेश असतो. पंचरत्न लाडूमध्ये चणाडाळ, मूगडाळ, तूरडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ आदी पाच डाळींचा समावेश असतो. शिंगाडय़ाच्या पिठाच्या लाडूंना उपवासाच्या दिवशी मोठी मागणी असते. उपवासासाठी खजूर लाडूंनाही मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे ‘ऋतू फूड्स’चे जयंत परचुरे यांनी सांगितले.

संकष्टी चतुर्थीला अनेक घरांमध्ये उपवास सोडण्यासाठी मोदक लागतात. मात्र नव्या पिढीतील नोकरदार महिलांना हल्ली मोदक करायला वेळ मिळत नाही. ऋतू फूड्समध्ये अगदी घरगुती चवीचे मोदक मिळतात. येथील मोदकही चांगला भलामोठा असतो. पांढरा शुभ्र सुवासिक मोदक पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटते. या वैशिष्टय़पूर्ण पदार्थाबरोबरच येथे नेहमीची पोळी भाजीही मिळते. ‘ऋतू फूड्स’चे माहितीच्या महाजालात संकेतस्थळही आहे. त्यामुळे पदार्थ ऑनलाइनही मागविता येतात. ज्वारी, नाचणी आणि तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकऱ्या येथे मिळतात. बहुतेक सर्वाना चकली खायला आवडते. मात्र त्यातील तेलकटपणामुळे आरोग्याची काळजी वाटत राहते. ‘ऋतू फूड्स’मध्ये मिळणारी चकली तेलविरहित असल्याने तसली चिंता राहत नाही. कुरकुरीत चकली, शेव, चिवडाही मिळतो.

ऋतू फूड्स

कुठे– स्नॅक्स, ठाणे महानगरपालिकेच्या मागे, स्टेट बँकेसमोर, पाचपाखाडी, ठाणे (प.).