ठाणे – येथील वागळे इस्टेट भागातील ब्रँडमा कंपनी जवळ असलेल्या मोठ्या नाल्याचे सफाईचे काम सुरु आहे. या नाल्यातील कचऱ्याचा ढीग बाजूला असलेल्या रस्त्यावर लावण्यात आला आहे. परंतु, या रस्त्यावर एका बाजूला खाद्यपदार्थ्यांच्या बेकायदेशिररित्या अनेक गाड्या उभ्या राहत असून त्या गाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. या घाणीच्या साम्राज्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री करणे म्हणजे एकप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशी करु लागले आहेत.
वागळे इस्टेट भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. याठिकाणी ठाणे, मुंबई, तसेच उपनगरातील मोठ्यासंख्येने नोकरदार वर्ग नोकरीसाठी येत असतो. वागळे इस्टेट भागातील ॲग्रीकल्चर परिसर, रस्ता क्रमांक १६, रस्ता क्रमांक २२ याठिकाणी या कंपन्या आहेत. या भागात मोठ्यासंख्येने औद्योगिक कंपन्या असल्यामुळे या कंपन्यांच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणारे फेरीवाले गाड्या उभे करुन विक्री करताना दिसून येतात. अगदी नाश्ता पासून ते जेवणापर्यंतच्या खाद्यपदार्थांची विक्री याठिकाणी होत असते. पदपथ अडवून हे फेरीवाले बेकायदेशिररित्या विक्री करतात. यापैकी अनेकांकडे अन्न परवाना देखील नसल्याचे आढळून येते.
वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक १६ येथे असलेल्या ब्रँडमा कंपनी जवळ मोठा नाला आहे. यानाल्याला जोडून एक रस्ता आहे. या रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री करणारे अनेक फेरीवाले उभे असलेले पाहायला मिळतात. सध्या मान्सून पूर्व नियोजन म्हणून ठाणे महापालिकेमार्फत नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. ब्रँडमा कंपनी जवळ असलेला नाला देखील साफ करण्यात येत आहे. या नाल्यातून मोठ्याप्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला आहे. या कचऱ्याचा ढीग खाद्यपदार्थांच्या गाड्यांच्या बरोबर समोर उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यातच, हे खाद्य पदार्थ विक्रेते सर्रासपणे याठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसून येत आहेत. हा एकप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळच सुरु आहे, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशी करु लागले आहेत.