Thane / ठाणे : गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटचा रविवार असल्यामुळे ठाणे शहराच्या विविध भागातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी अनेकजण सोमवारी निघणार आहेत, त्यामुळे त्यांची देखील बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु असल्याची दिसून येत आहे. या गर्दीमुळे स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच ही बाजारपेठ आहे. ठाणे स्थानक ते जांभळी नाक्यापर्यंत ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठ कपडे, दागिने, पुजेचे साहित्य अशा विविध साहित्य विक्रीच्या आस्थापना आहेत. याशिवाय, या बाजारपेठेत सण-उत्सवानुसार फेरिवाले विविध साहित्य विक्रीसाठी येतात. या बाजारात हार, फुलेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक येथे मोठी गर्दी करतात.

यंदाही गणेशोत्सवासाठी लागणारे विविध सजावटीच्या वस्तू, मखर, विद्यूत रोषणाईच्या माळा, तोरण, पुजेचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे खरेदी करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपासून नागरिकांनी बाजारात गर्दी केली. परंतू, शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळपासून नागरिकांनी मोठ्यासंख्येने बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन काही प्रमाणात कोंडी होत आहे.

बस वाहतूक पर्यायी मार्गाने

ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या कोर्टनाका येथून बाजारपेठेतील मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतात. परंतु गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेतील गर्दीमुळे बसगाड्यांचा वेग मंदावून त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीचा फटका बाजरपेठेला जोडणाऱ्या जांभळीनाका, तलावपाळी, राममारुती रोड, गोखले रोड या अंतर्गत मार्गांना बसत होता. रविवारी बाजारात नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या टॉवर नाका येथून वळण घेऊन मासुंदा तलाव मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेने प्रवास करत होत्या. त्यामुळे टॉवर नाका, मासुंदा तलाव, स्थानक परिसर तसेच राम मारुती रोड परिसरात काही प्रमाणात कोंडी झाली आहे.