ठाणे – केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आरोग्य आणि देशांतर्गत पर्यटनाशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना सुरुवात केली आहे. यामध्ये नागरिकांकडून कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा खर्च आणि कुटुंबाने देशांतर्गत पर्यटनासाठी केलेला खर्च याबाबतची सविस्तर माहिती गोळा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य आणि पर्यटन धोरण आखण्यात येते, यासाठी ही महत्वाची असते. तर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्वेक्षणात उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक संगिता मोरे यांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून विविध धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि धोरण राबविण्यासाठी विविध सर्वेक्षण करण्यात येत असतात. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सांख्यिकी अहवाल तयार करून विविध धोरणांची आखणी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ८०व्या फेरीचे क्षेत्रकार्य जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या फेरीअंतर्गत “कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य” आणि “देशांतर्गत पर्यटन व त्यावरील खर्च” या विषयांवरील सविस्तर पाहणी केली जाईल. या सर्वेक्षणांतून मिळणारी माहिती ही केंद्र व राज्य सरकारांना पुढील आरोग्यविषयक योजना, विमा योजना, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा उभारणीसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

आरोग्यविषयक सर्वेक्षणाचा उद्देश सरकारी व खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवांचा वापर, उपचारांवरील खर्च, स्वतःकडून केलेला खर्च, लसीकरण, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची वैद्यकीय सेवा यांसारख्या घटकांची अचूक माहिती संकलित करणे हा आहे. या आकडेवारीच्या आधारे आरोग्यविषयक योजना व धोरणांची आखणी करण्यात येईल. तर देशांतर्गत पर्यटनावरील सर्वेक्षणात नागरिकांच्या देशांतर्गत प्रवासाचा तपशील, प्रवासाचे प्रकार व त्यावरील खर्चाची माहिती गोळा केली जाणार आहे. ही आकडेवारी ‘पर्यटन लेखा’ तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, त्याद्वारे सरकारकडून संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना यांना माहिती सादर केली जाईल. या आधारावर ‘प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक’ तयार होईल आणि त्यानुसार पर्यटन विषयक धोरणे आखता येतील.

या सर्वेक्षणासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी निवडलेल्या भागांतील घराघरांत जाऊन आरोग्य आणि पर्यटनाशी संबंधित माहिती संकलित करणार आहेत. संकलित केलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर आरोग्य व पर्यटन क्षेत्राशी निगडित अचूक माहिती शासनाच्या धोरणांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे ठाणेकरांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करून आवश्यक माहिती प्रामाणिकपणे द्यावी,” असे आवाहन उपसंचालक संगिता मोरे यांनी केले.

आरोग्य क्षेत्रातील खर्चाचे स्वरूप, उपचारपद्धतींवरील लोकांचा कल, खासगी व शासकीय आरोग्य सेवांचा वापर, तसेच कुटुंबांचा देशांतर्गत प्रवासासाठी असलेला उत्साह आणि त्यावरील आर्थिक खर्च याबाबत अचूक आकडेवारी तयार होईल. या आधारे आरोग्य विमा कवच, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या, पर्यटनस्थळांवरील स्वच्छता, निवासव्यवस्था आणि वाहतूक सुविधा यामध्ये सुधारणा करण्यास दिशा मिळेल.

जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती प्रामाणिकपणे देण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ठाणे हे औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेले केंद्र असल्याने येथील लोकसंख्येचे सामाजिक, आर्थिक चित्र जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणास सकारात्मक प्रतिसाद देऊन सरकारला आरोग्य व पर्यटनविषयक मजबूत धोरणे आखण्यास हातभार लावावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.