ठाणे : सलग दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने तिसऱ्या दिवशी काहीशी उसंत घेतली. परंतु ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे पाणी ओसरले नव्हते. तलाव, नदी काठच्या भागात पाणी साचले होते. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला. काही नागरिकांच्या घरात आणि व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले होते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. मंगळवारी मुसळधार पावसामुळे अनेक नोकरदारांचे हाल झाले होते. बुधवारी अशीच स्थिती होऊ नये म्हणून काही नोकरदारांना सुट्टी घ्यावी लागल्याने त्यांच्या दिवसाची रोजंदारी बुडाली.
जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. वाहतुक कोंडी झाल्याने प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला होता. बुधवारीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु पहाटे आणि सकाळी पाऊस पडल्यानंतर दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतली. असे असले तरी मागील दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे अनेक भागातील रस्ते, परिसरातील साचलेले पाणी पूर्णपणे ओसरले नव्हते. ठाणे शहरातील उपवन भागात तलावातील पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.
भिवंडीतही तीन बत्ती, छत्रपती शिवाजी चौक, अंजुरफाटा भागात पाणी ओसरले नव्हते. त्याचा परिणाम येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसला. तीन बत्ती येथील भाजी विक्रेत्यांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला. विक्रीसाठी आणलेली भाजी पावसामुळे वाहून गेली होती. काल्हेर, कशेळी येथील गोदाम परिसर, नागरी वस्तीत पाणी साचल्याने येथील गोदाम परिसरातील कामगार आणि रहिवाशांचे हाल झाले. शहाड जवळील मोहने गाव पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.