ठाणे : लंडनचे बिग बेन आणि मुंबईचा राजाबाई क्लॉक टॉवर सर्वांच्या परिचयाचे असणार. शतकाहून अधिक काळ हे मनोरे दिमाखात उभे आहेत आणि या वेगवान शहरांना अचूक वेळ सांगत आहेत. असेच एक घड्याळ ७५ वर्षांपासून ठाणे शहरातही विराजमान आहे. तुम्ही हे ऐतिहासिक घड्याळ पाहिले आहे का ?
१९०० च्या दशकात प्रत्येकाकडे हातात घालणारे घड्याळ नव्हते. अशावेळी घराबाहेर पडल्यावर वेळ समजायची नाही. अशावेळी लोक वेळ ओळखण्यासाठी नैसर्गिक घटकांवर आणि निरीक्षणांवर अवलंबून असत. दिवसाचा वेळ प्रामुख्याने सूर्याच्या स्थितीनुसार ओळखला जात असे सकाळी सूर्य पूर्वेकडे उगवला की दिवसाची सुरुवात झाली असे समजले जाई, दुपारी सावली सर्वात लहान झाली की मध्यान्ह झाला असे कळे, आणि सूर्य पश्चिमेला झुकू लागला की संध्याकाळ आली असे लोक समजत.
त्याकाळात ब्रिटीशांची एक संकल्पना होती. शहराच्या मध्यभागी किंवा चौकात मोठे घड्याळ उभारले जात असे. या घड्याळामुळे नागरिकांना वेळ समजत. कालांतराने ही संकल्पना भारतात आली.
ठाणे शहरातही ही संकल्पना राबवण्यात आली होती. जांभळी नाका येथे आनंद टॉवर वर असे ऐतिहासिक घड्याळ होते. त्यासह गावदेवी परिसरात १९५० साली बेडेकर कुटूंबाकडून रुग्णालयाची इमारत बांधण्यात येत होती. त्यावेळी इमारतीवर सामाजिक बांधिलकी म्हणून ब्रिटीश कालीन हे घड्याळ देखील लावण्यात आले होते. या जुन्या आणि ऐतिहासिक घड्याळाचा बेडेकर कुटूंबाकडून अगदी काळजीपूर्वक सांभाळ केला जात आहे. या घड्याळाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत.
ऐतिहासिक घड्याळाची आठवण…
डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितलेली की, “गावदेवी परिसरात असलेल्या बेडेकर रुग्णालयाच्या इमारतीवरील घड्याळ पूर्वी ठाणे स्थानक परिसरातून देखील स्पष्ट दिसायचे. त्यावेळी बहुतांश नागरिकांकडे घड्याळ नसायची तेव्हा लोकल पकडताना नागरिकांना या घड्याळाचा आधार व्हायचा. या घड्याळात वेळ बघून लोक प्रवास करायची. एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्या आजोबांनी त्याकाळात स्थानक परिसराच्या मध्यभागी हे ब्रिटीशकालीन घड्याळ लावले होते.”
या घड्याळाची देखभाल दुरुस्ती करणे आताच्या काळात कठीण…
“ब्रिटीशकालीन घड्याळ माझ्या आजोबांनी एका ब्रिटीश कंपनीकडून घेतले होते. या घड्याळावरील आकडे रोमन अंकात आहेत. पूर्वी हे घड्याळ चावीवर चालायचे. आता तंत्रज्ञानात अधिक बदल होत गेला आहे. त्यामुळे आताच्या काळात या घड्याळाची देखभाल दुरुस्ती करणे आमच्यासाठी कठीण बनले आहे. परंतू, हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही सर्वोत्तोपरी प्रयत्न करत राहू,”असे मत महेश बेडेकर यांनी व्यक्त केले.
नागरिकांना आवाहन…
बेडेकर रुग्णालयाच्या परिसरातून जाताना गजबजलेल्या या ठाणे शहरात ऐटीत उभ्या असलेल्या ऐतिहासिक दर्जा आणि आमचा वारसा असणाऱ्या या घड्याळाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन डॉ. बेडेकर यांनी नागरिकांना केले आहे.
