ठाणे : ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची पाच वर्षांपूर्वी भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची पुन्हा चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जमील शेख यांचे कुटुंबिय वारंवार अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे नजीब मुल्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना, त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तर, गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली होती.त्यानंतर पोलिसांनी टप्प्याटप्प्याने सात जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी जमील शेख यांची पत्नी आणि नातेवाईकांनी ही हत्या अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप केला होता.

काही दिवसांपूर्वीच जमील शेख यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार दिली होती. तसेच, नजीब मुल्ला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात पोलिसांनी या हत्येप्रकरणी हलगर्जी केल्याचा आरोप केला होता. अखेर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपी होते. त्यापैकी सात जणांना अटक झाली असून एकाची न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. तर उर्वरित सहाजण न्यायालयीन कोठडीत आहेत. जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी स्वतंत्र चौकशी केली जाईल. पुरावे पडताळून संबंधित व्यक्तीचा सुताराम संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नजीब मुल्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जमील शेख हत्या, भाजप आणि आव्हाड

जमील शेख यांची हत्या झाली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. भाजपकडून याप्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली जात होती. राष्ट्रवादी पक्ष फुटण्यापूर्वी भाजपचे ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्याकडून वारंवार याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात होती. राज ठाकरे हे ठाण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे तत्त्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडून तपासाबाबत माहिती जाणून घेतली होती. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर नजीब मुल्ला हे अजित पवार गटात गेले. त्यानंतर आव्हाड यांनी हे प्रकरण उचलून धरले. नजीब मुल्ला हे आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. परंतु ते अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांनी जमील शेख हत्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण होते जमील शेख

जमील शेख हे राबोडी भागातील मनसेचे वाॅर्ड अध्यक्ष होते. त्यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये मनसेकडून नजीब मुल्ला यांच्याविरोधात महापालिका निवडणूक लढविली होती. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांनी राबोडी भागातील अनधिकृत बांधकामाविषयी अर्ज आणि तक्रारी दाखल केल्या होत्या. जमील शेख यांचे नातेवाईक फैजल केलेल्या आरोपानुसार, राबोडी भागात क्लस्टर योजनेचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण सुरु होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांना सर्वेक्षणासाठी कागदपत्र देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजेच, २३ नोव्हेंबर २०२० त्यांची हत्या झाली.