डोंबिवली – येथील स्टार कॉलनीतील एका जवाहिऱ्याने ऑक्टोबरमध्ये आपल्या दुकानातील १९१९ गॅम सोन्याचे एक कोटी पाच लाख ५४ हजार रूपये किमतीचे दागिने ठाण्यातील एका सराफाला सफाई आणि कलाकुसरीसाठी ऑक्टोबरमध्ये दिले होते. या सराफाने हे दागिने मूळ मालकाला अंधारात ठेऊन परस्पर दुसऱ्या जवाहिऱ्याकडे गहाण ठेऊन त्या बदल्यात ५० लाख रूपये घेतले. या दोन्ही जवाहिऱ्यांनी डोंबिवलीच्या जवाहिऱ्याला सोन्याचे दागिने किंवा त्या बदल्यात पैसे देण्याचे नाकारल्याने मंगळवारी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, सुरेश सोनी यांचे डोंबिवलीतील स्टार काॅलनी सागाव भागात पुष्पदीप नावाचे जवाहिऱ्याचे दुकान आहे. दुकानातील दागिने ते नेहमी ठाण्यातील टेंभीनाका जिल्हाधिकारी कार्यालया जवळील लेजर ॲन्ड शोल्डर या दुकानाचे मालक सुरेशकुमार जैन यांच्याकडे सफाई आणि कलाकुसरीसाठी देतात. ऑक्टोबरमध्ये सोनी यांनी नेहमीप्रमाणे दुकानातील १९१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, मणिहार, सोनसाखळी, जुवाकिसु असा एक कोटी पाच लाखाचा ऐवज ठाण्याचे जवाहिर सुरेशकुमार जैन यांच्या ताब्यात दिला. महिनाभरात हे दागिने परत देण्याचे आश्वासन जैन यांनी सोनी यांना दिले होते.

हेही वाचा >>> कळवा रुग्णालयात एका क्लिकवर कळणार रुग्णांचा पुर्वइतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक दिवस उलटून जैन दागिने परत करत नाहीत म्हणून सोनी यांनी दागिने परत करण्याचा तगादा लावला. जैन यांनी आपले वडील आजारी आहेत. रुग्णालयात जावे लागते, अशी कारणे देऊन दागिने परत करण्यास टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात जैन यांनी सोनी यांना न सांगता त्यांचे १९१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मुंबईतील एल्फिस्टन रोड येथील राजेश सुकनराज जैन (५१) या विक्री व्यवस्थापकाकडे सहा महिन्याच्या अवधीसाठी गहाण ठेवले. त्या बदल्यात सुरेशकुमार यांनी राजेश यांच्याकडून ५० लाख रूपये घेतले. सहा महिने उलटून सुरेशकुमार दागिने सोडविण्यासाठी येत नाहीत. म्हणून राजेश यांनी सुरेशकुमार यांची वाट न पाहता ते दागिने मोडून टाकले. सुरेश सोनी यांनी ठाण्याचे आरोपी जैन यांच्याकडे दागिने परत करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी जैन यांनी आर्थिक अडचणीमुळे आपण दागिने एल्फिस्टन रोड येथील राजेश जैन यांच्याकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. राजेश जैन यांनी आपण दागिने मोडले असल्याचे सोनी यांना सांगितले. दागिने परत मिळण्याची शक्यता नसल्याने आणि दोन्ही आरोपींनी आपली फसवणूक केल्याने सुरेश सोनी यांनी मंगळवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी राजेश जैन यांना बोलावून घेतले होते. त्यांनी १५ दिवसात सोनी यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळले नाही, असे सोनी यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.