ठाणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. त्यापैकी ११ किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत. या जागतिक वारसा स्थळांचा इतिहास ठाण्यात व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. शिवछत्रपतींचे दुर्ग : जागतिक वारसा स्थळे या विषयावर महाराष्ट्र पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, जोशी बेडेकर महाविद्यालय आवारातील थोरले बाजीराव पेशवे सभागृह होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रजा, त्यांच्या हिताबाबतची धोरणे, युद्धनीती, गनिमी कावा या सर्व गुणांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबाबतही अभ्यास संशोधन केले जात असते. अशातच महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खात्याकडूनही अनेक संशोधन केले गेले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाच्या निमित्ताने ठाणे येथील प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि के. जी. जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
शिवछत्रपतींचे दुर्ग : जागतिक वारसा स्थळे या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचे मुख्य वक्ते महाराष्ट्र पुरात्तव व संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे असणार आहेत. डॉ. गर्गे या व्याख्यानात किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी झालेली प्रक्रिया, यामध्ये आलेल्या अडचणी, तसेच किल्ले वारसायादीत कायमस्वरूपी राहावेत यासाठी पुढील काळात सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांची जबाबदारी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
हे व्याख्यान शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, थोरले बाजीराव पेशवे सभागृह, जोशी-बेडेकर महाविद्यालय, चेंदणी बंदर रोड, ठाणे येथे होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. महेश बेडेकर यांनी विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी तसेच सामान्य नागरिकांनी या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन केले आहे.
