नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्यात येणार असला तरी ठाणे वाहतूक पोलिसांनी या काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील टेंभीनाका आणि कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवात देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मिरवणुकांना यंदा बंदी आहे. परंतु एखाद्या मंडळाने मिरवणूक काढलीच तर त्यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडू शकतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल लागू केले आहेत. ठाणे येथील टेंभीनाका चौकातील रस्त्यावर नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारण्यात येतो. तसेच कल्याण येथील दुर्गाडी किल्यावरही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यामुळे या दोन्ही भागांतील रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या मार्गांवरही वाहतूक बदल लागू तरण्यात आले आहेत. १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हे बदल लागू राहाणार आहेत.

वाहतूक बदल असे…

  •   टेंभीनाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टॉवरनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने टॉवरनाका येथून गडकरी चौक, अल्मेडा चौक मार्गे सोडण्यात येणार आहेत.
  •  गडकरी चौकातून टॉवरनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वसंत हॉटेल येथे प्रवेशबंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने गडकरी चौक येथून दगडीशाळामार्गे सोडण्यात येणार आहेत.
  •  चरई येथून भवानी चौक, टेंभीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना धोबीआळी येथे प्रवेशबंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने डॉ. सोनुमिया रोड, धोबीआळी मशीद येथून सोडण्यात येणार आहेत.
  •  कोर्टनाका येथून टेंभीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.
  •  मिनाताई ठाकरे चौकातून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जाणाऱ्या वाहनांना जिल्हा रुग्णालय परिसरात प्रवेशबंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने कोर्टनाका येथून जांभळीनाका मार्गे रेल्वे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत.
  •  कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी लालचौकी ते दुर्गामाता चौकमार्गे भिवंडीत जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना लालचौकी येथे प्रवेशबंद असणार आहे. या मार्गावरील वाहने लाल चौकीकडून आधारवाडी चौक, गांधारी मार्गे सोडण्यात येणार आहेत.
  •  भिवंडी येथून लालचौकीच्या दिशेने येणारी जड-अवजड वाहने दुर्गामाता चौकाकडून डावीकडे वळण घेऊन वाडेघर चौक, आधारवाडी चौक येथून जातील.
  •  पत्रीपूल येथून गोविंदवाडी बाह््यवळण मार्गावरून दुर्गाडी चौकाकडे तसेच दुर्गाडी चौकाकडून पत्रीपुलाकडे येणारी हलकी वाहनांना सायंकाळी ४ नंतर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने आग्रा रोड, पत्रीपूल, शिवाजी चौक, लालचौकी मार्गे जातील. तसेच दुर्गाडी येथून लालचौकी, शिवाजी चौक, वलीपीर येथून जातील.

करोनाच्या काळात मिरवणुकींना बंदी आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. अचानक एखादी मिरवणूक निघाली किंवा रस्त्यावर गर्दी झाल्यास वाहतूकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत बदल केले जाण्याची शक्यता आहे.

– अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane kalyan transportation changes akp
First published on: 16-10-2020 at 00:17 IST