ठाणे : ठाणे पुर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा’ (सॅटीस) प्रकल्पाकरिता उड्डाण पुल उभारण्यात आलेला आहे. परंतु जुन्या कोपरी पुलाजवळ रेल्वेच्या दोन्ही बाजूला खांब उभारण्यात आले असले तरी काही कारणास्तव त्यावरील गर्डर बसविण्याचे काम रखडले होते.

दरम्यान, या कामाला शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरूवात झाली. या कामासाठी जुुना कोपरी पुल आणि त्या खाली असलेल्या रेल्वे मार्गिकेवर क्रेन उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या कामासाठी जूना कोपरी पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सॅटीस प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ठाणे पुर्व रेल्वे स्थानक भागातही ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून सुमारे २६० कोटी रुपये खर्चुन सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षांपुर्वी करण्यात आली. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे याठिकाणी खांबांवर गर्डर बसविणे शक्य होत नव्हते.

या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक देण्याची मागणी केली होती. त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविताच २६ जुलैपासून खांबांवर गर्डर बसविण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. गर्डरचा आकार ४६ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद आहे. ३ ऑगस्टपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कामादरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.

यानुसार शनिवार दुपारपासून जुन्या कोपरी पुलावरून वाहतूक पुर्णपणे बंद केली आहे. २६ ते २७ जुलै, २७ ते २८ जुलै आणि २९ ते ३० जुलै या दिवशी दुपारी २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत तर, २८ ते २९ जुलै, ३० ते ३१ जुलै, १ ते २ ऑगस्ट, २ ते ३ ऑगस्ट आणि ३ ते ४ ऑगस्ट या कालावधीत रात्री ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जुना कोपरी पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

असे आहेत वाहतूक बदल

ठाणे पश्चिमेकडुन मार्गाजवळील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंद नगर सिग्नल, मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे सोडण्यात येत आहेत. तीन हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल येथून ठाणे रेल्वे स्थानक पुर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही वाहने गुरुव्दारा, आनंद नगर सिग्नल, फाॅरेस्ट नाका, कोपरी सर्कल मार्गे सोडण्यात येत आहेत. मुबईवरून हरिओमनगर कट मार्गे कोपरी कडे येणाऱ्या वाहनांना हरिओमनगर कट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. ही वाहने आनंद नगर येथून महामार्गे मार्गे सरळ पुढे तीनहात नाका येथून युटर्न घेवुन आनंद नगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल येथुन सोडण्यात येत आहेत. ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, प्राणवायु पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.