ठाणे – ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ व परिणामकारक पद्धतीने मिळणार असून त्यांची धावपळ थांबण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत नुकतेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित झाले असून, हे केंद्र दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या योजनांचे मार्गदर्शन आणि सहाय्य देणारे केंद्र ठरणार आहे.

दिव्यांग नागरिकांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योजकता, प्रवास सवलती, आरोग्य सेवा, निवास, शिष्यवृत्ती अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधी दिव्यांग नागरिकांना सतत कार्यालयात धावपळ करावी लागत होती. दिव्यांग नागरिकांची ही धावपळ थांबावी यासाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना आता वेगवेगळ्या विभागांची धावपळ करावी लागणार नाही.

एका ठिकाणी सर्व माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. या कार्यालयामार्फत दिव्यांग नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, लाभ मिळविण्यासाठी सहाय्य आणि समस्या निवारण यासाठी मदत केली जाणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशी कार्यालये सुरू केल्यानंतर ठाण्यातही हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे लाखो दिव्यांग नागरिकांना योजनांचा योग्य लाभ घेणे अधिक सुलभ होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

या केंद्रातून या सुविधा मिळणार…

दिव्यांग नागरिकांना या केंद्रातून शासकीय योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया, प्रवास सवलती, शिष्यवृत्ती, उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शन, आरोग्य व निवाससंबंधी योजना, समस्या निवारण व तक्रार निवारणासाठी सहाय्य, प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या सेवा मिळणार आहेत. हे कार्यालय १ सप्टेंबरपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत, स्वेअरफिट होम (जीएसटी भवन समोर), वागळे इस्टेट रोड क्र.२२, तळमजला येथे कार्यरत झाले आहे.

“दिव्यांग बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे सर्वांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा,” – उज्वला सपकाळे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी.