ठाणे : गेल्याकाही वर्षांपासून पुणे, नागपूर प्रमाणे ठाणे शहरातील गुन्हेगारी विषयी देखील चर्चा होऊ लागली आहे. गणेशोत्सवात क्षुल्लक कारणावरून एकाला कारखाली चिरडून मारण्याचा प्रकार वागळे इस्टेटमध्ये घडला असताना आता थेट चायनिज वेळत दिले नाही म्हणून थेट तलवार उपसल्याचा भयंकर प्रकार उघ़डकीस आला आहे. तलवारीने संबंधित हातगाडी तोडण्यात आली असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील गुन्हेगारी विषयी गेल्याकाही वर्षांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. अनेकजण गुन्हेगारी प्रवृत्तीने गुंडगिरी करू लागले आहे. त्यामुळे ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी देखील प्रश्नचिन्ह होत आहे. असाच काहीसा प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ठाण्यातील मनोरुग्णालयाजवळील चौकात हा प्रकार उघडकीस आला. यातील तक्रारदार यांचे मनोरुग्णालयाजवळील चौकात हातगाडीवर चायनिज पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. २३ ऑक्टोबरला रात्री तक्रारदार यांनी हातगाडी लावल्यानंतर ते कामगारांना साहित्य सोपवून तेथून निघून गेले. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दोनजण चायनिजचे पदार्थ खाण्यासाठी हातगाडीवर गेले. त्यावेळी त्यांनी चायनिज वेळेत का दिले नाही म्हणून कामगारांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तेथे जमलेल्या लोकांनी त्या दोघांना तेथून हकलावून दिले.

तलवार घेऊन आले, तोडफोड करुन गेले…

काही वेळाने ते दोघे त्यांच्या आणखी दोन साथिदारांना घेऊन तिथे आले. कामगारांनी तात्काळ त्यांच्या तक्रारदाराला याबाबतची माहिती दिली. तक्रारदार त्यांच्या दोन मित्रांसोबत हातगाडीजवळ आले असता, त्यांच्या कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण सुरु असल्याचे दिसले. त्यापैकी एकाच्या हातात तलवार होती. तो तलवारीने हातगाडीने तोडफोड करत शिवीगाळ करु लागला होता. त्याचवेळी त्याने तक्रारदार यांच्या मित्राच्या पायावर वार केला. तसेच नागरिकांना धमकाविण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिक देखील तेथून पळून गेले. चौघांनी तक्रारदार यांची हातगाडी उलटविली. तक्रारदार आणि त्यांचे मित्र घाबरल्याने त्यांनी काही दिवस तक्रार दिली नव्हती. अखेर ५ नोव्हेंबरला त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम २५, ४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१), ३७ (३) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम ११५(२), ११८ (१), ३(५), ३२४(४) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.